मालगाडीचा डबा चाले डकाव-डकाव

railway from Visakhapatan to Uttar Pradesh completed rtravel in four year
railway from Visakhapatan to Uttar Pradesh completed rtravel in four year

गोरखपूर (उत्तर प्रदेश) - भारतात रेल्वेचा प्रवास सर्वांत स्वस्त समजला जातो. बदलत्या काळानुसार भारतीय रेल्वेत अनेक सुधारणा होत आहे. डिजिटल उपकरणांद्वारे प्रवास अधिक सुखकर होत आहे. मात्र, आधुनिकीकरणाकडे वेगाने धाव घेणाऱ्या भारतीय रेल्वेने एक हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्यासाठी चार वर्षे घेताना कूर्मगतीचीही चुणूक दाखविली आहे. विशाखापट्टणहून खतांच्या गोण्या घेऊन चार वर्षांपूर्वी निघालेल्या मालगाडीचा एक डबा (वाघिण) तब्बल उत्तर प्रदेशमधील बस्ती रेल्वे स्थानकावर बुधवारी (ता. 25) दुपारी पोचला. 

डाय अमोनिया फॉस्फेट (डीएपी) या खताच्या एक हजार 316 गोण्या भरून या डब्यात होत्या. 10 नोव्हेंबर 2014 रोजी तो विशाखापट्टणहून आरक्षित केला होता. बस्तीपर्यंतचे एक हजार 316 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी या डब्याला तब्बल चार वर्षे लागली. एवढे अंतर कापण्यासाठी साधारणपणे 42 तास 13 मिनिटे एवढा वेळ लागतो. बस्ती रेल्वे स्थानकावर डब्याचे बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आगमन झाल्यावर रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आश्‍चर्याला पारावार राहिले नाही. 

उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी संजय यादव याबाबत म्हणाले, की "काही वेळा मालगाडी किंवा रेल्वेचे डबे प्रवासासाठी सक्षम नसतात तेव्हा ते यार्डात पाठविले जातात. या मालगाडीबाबतही असेच झाले असण्याची शक्‍यता आहे. यातील खत खरेदी करणाऱ्याची नोंदणी बस्तीमधील उद्योजक रामचंद्र गुप्ता यांच्या नावे होती. "इंडियन पोटॅश लिमिटेड'च्या (आयपीएल) माध्यमातून गुप्ता त्यांच्या नावाने हा डबा 2014मध्ये विशाखापट्टणहून आरक्षित केला होता.' या प्रकरणी गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""डब्यातील उत्पादन कंपनीचे आहे. त्याचे पैसे चुकते करण्याची जबाबदारी माझी नाही. कंपनी व भारतीय रेल्वे यांच्यामधील ही बाब आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे एवढ्या काळात गुप्ता व रेल्वेनेही या बेपत्ता डब्याबाबत चौकशी केली नाही. 

बस्ती भागातील वितरकांसाठी नोव्हेंबर 2014 मध्ये विशाखापट्टणहून मालगाडीचा डबा आरक्षित केला होता, हे खरे आहे. पण नंतर हा डबा मालगाडीपासून वेगळा झाला. गुप्ता हे कंपनीचे मध्यस्त आहेत. डब्यातील साहित्याची किंमत 14 लाख रुपये आहे. कंपनीने यापूर्वीच रेल्वेवर दावा दाखल केला आहे. साहित्याचे मूल्यांकन केल्यानंतर ते आमच्या ताब्यात आले. - डी. के सक्‍सेना, सहायक विपणन व्यवस्थापक 

खतांच्या डब्याचा प्रवास 

10 नोव्हेंबर 2014 - विशाखापट्टणवरुन प्रस्थान 

25 जुलै 2018 - डबा बस्तीला पोचला 

1,316 - एकूण किलोमीटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com