लष्करी जवानांचे निवृत्तीचे वय वाढविण्याची शिफारस

पीटीआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

सध्या लष्करात शिपाई म्हणून भरती होणारे जवान पदोन्नती न मिळाल्यास 17 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होतात. सुमारे 80 टक्के शिपाई म्हणूनच निवृत्त होतात. दरवर्षी लष्करातून 60 हजार शिपाई निवृत्त होतात.

 

नवी दिल्ली - लष्करातील जवानांचे (शिपाई) निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढविण्याची शिफारस संरक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या समितीने केली असून, ही शिफारस मंजूर झाल्यास लष्कराच्या खर्चात हजारो कोटी रुपयांची बचत होणार आहे. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठी समस्या सध्या लष्कारासमोर आहे.

या संदर्भात विचार करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने आपला अहवाल मागील महिन्यात सादर केला असून, त्यात लष्करातील जवानांच्या निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढविण्याची शिफारस केल्याचे समजते. लष्कराची सज्जता वाढविण्यासाठी अनुपयोगी खर्चात कपात करून उपलब्ध स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देण्यात यावा, असे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी लष्करातील जवानांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे.
सध्या लष्करात शिपाई म्हणून भरती होणारे जवान पदोन्नती न मिळाल्यास 17 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होतात. सुमारे 80 टक्के शिपाई म्हणूनच निवृत्त होतात. दरवर्षी लष्करातून 60 हजार शिपाई निवृत्त होतात.

त्यामुळे शेकटकर समितीची शिफारस मंजूर झाल्यास लष्कराच्या खर्चात मोठी बचत तर होईलच; पण प्रशिक्षित अधिक मनुष्यबळही उपलब्ध होणार आहे. परिणामी प्रशिक्षणावरील खर्चही कमी होणार आहे. शिपाई म्हणून निवृत्त होणारे जवान प्रशिक्षित असतात आणि तंदुरुस्तही असतात, त्यामुळे निवृतीचे वय वाढविण्याची शिफारस करण्यात आल्याचे सांगितले जाते.