प्रतिकूल परिस्थितीवर 'नीट'नेटकी मात

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

घर सांभाळत रूपा यादवने मिळवले यश

कोटा (राजस्थान) : वयाच्या आठव्या वर्षी ती विवाहबद्ध झाली. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, शिक्षण घ्यायचे, त्याच वयात तिच्यावर संसाराची जबाबदारी आली, घरामध्ये अठराविश्‍वे दारिद्य्र असतानाही तिने शिक्षणाची कास सोडली नाही. अखेर ती 21 व्या वर्षी "नीट' परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने या परीक्षेमध्ये 603 एवढे गुण मिळवत अखिल भारतीय पातळीवर 2,612 रॅंकिंग मिळवली. रूपा यादव या तरुणीची ही यशोगाथा सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे.

रूपाचा पती आणि दीर हे दोघेही शेतकरी आहेत. रूपामधील शिक्षणाविषयीची तळमळ पाहून त्यांनी पडेल ते काम करून तिला आर्थिक मदत केली. प्रसंगी ऑटोरिक्षा चालवून या दोघांनी पैसे कमावले. जयपूर जिल्ह्यातील कारेरी हे रूपाचे मूळ गाव. रूपाचा शंकरलालसोबत विवाह झाला तेव्हा ती इयत्ता तिसरीमध्ये शिकत होती. रूपाची लहानी बहीण रूक्‍मा हिचाही शंकरलालचा लहान भाऊ बाबूलालसोबत विवाह लावून देण्यात आला होता. इयत्ता दहावीमध्ये रूपाने 84 टक्के एवढे गुण मिळवले होते. पुढे घरची जबाबदारी सांभाळत तिने बारावीमध्ये तितकेच गुण संपादन केले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर रूपाने बीएस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्याचबरोबर तिने "नीट'चीही तयारी सुरू ठेवली होती. पहिल्या टप्प्यामध्ये तिला मनाजोगे यश मिळाले नव्हते, पुढच्या टप्प्यामध्ये मात्र तिने हे यश अक्षरशः खेचून आणले. या यशाबाबत किंचितही गर्व न बाळगणाऱ्या रूपाने आदिवासी भागामध्ये जाऊन रुग्णसेवा करण्याची आपली इच्छा असल्याचे सांगितले.