महाराणा प्रताप यांना महान का म्हणत नाहीत?

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

अकबराला महान म्हटले जाते याबाबत मला आक्षेप नाही. मात्र, मग महाराणा प्रताप यांना का महान म्हटले जात नाही?

जयपूर - "इतिहासकार अकबराला महान म्हणतात; पण महाराणा प्रताप यांना म्हणत नाहीत, याचे आश्‍चर्य वाटते. राणा प्रताप यांच्यात काय कमतरता होती की त्यांना महान म्हटले जात नाही', असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज उपस्थित केला.

प्रताप यांच्या 477 व्या जयंतीनिमित्त राजस्थानमधील पाली जिल्ह्यात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण राजनाथसिंह यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या सभेत राजनाथसिंह म्हणाले,"" महाराणा प्रताप हे खरे द्रष्टे योद्धे होते. त्यांनी आत्मसन्मानासाठी ऐषाराम आणि राज्याचाही त्याग केला. त्यांनी आपल्या जीवनात अतुलनीय धाडसाचे प्रदर्शन केले. अकबराला महान म्हटले जाते याबाबत मला आक्षेप नाही. मात्र, मग महाराणा प्रताप यांना का महान म्हटले जात नाही?'' छत्रपती शिवाजी आणि महाराणा प्रताप हे 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी झालेल्यांचे प्रेरणास्थान होते, असे राजनाथ यांनी सांगितले. भारतीय इतिहासात महाराणा प्रताप यांना योग्य स्थान न देऊन आपल्या इतिहासकारांनी मोठी चूक केली असून, ती चूक दुरुस्त करण्याची गरज असल्याचा दावाही त्यांनी केला. इतिहासकारांनी महाराणा प्रताप यांच्या कार्याचा फेरआढावा घ्यावा, अशी विनंती त्यांनी या वेळी केली.