'एनडीए'चे रामनाथ कोविंद भारताचे 14 वे राष्ट्रपती

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

आज सकाळी दिल्लीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मला माझ्या गरिबीत गेलेल्या बालपणाची आठवण आली. आजच्या पावसातही माझ्यासारखे अनेक रामनाथ कोविंद भिजत असतील. हा देश तुमच्याबरोबर आहे, असे मला त्यांना सांगावयाचे आहे

नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांनी देशाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये 65.65% मते मिळवित निर्णायक विजयाची नोंद केली. कोविंद यांच्या प्रतिस्पर्धी व संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) उमेदवार मीरा कुमार यांना या निवडणुकीत अवघी 34.35% मते मिळाली. या विजयाबरोबरच देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथबद्ध होण्याचा कोविंद यांचा मार्ग औपचारिकरित्या प्रशस्त झाला आहे.

"कोविंद यांना 2930 मते मिळाली; तर मीरा कुमार 1844 मते मिळाली. निवडणुकीतील एकूण 77 मते अवैध ठरली,'' असे निवडणूक आयोगाचे अधिकारी अनूप मिश्रा यांनी स्पष्ट केले. विजयी कोविंद यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.

"रामनाथ कोविंद यांना विविध राज्यांमधून मिळालेला पाठिंबा पाहून अत्यंत आनंद झाला. तुमचा लाभलेला सहवास ही मला कायमच मानाची बाब वाटत आली आहे. मीरा कुमार यांचेही अभिनंदन. आपणा सर्वांनाच अभिमान असलेल्या लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणारीच तुमची मोहिम होती,'' असे पंतप्रधानांनी या पार्श्‍वभूमीवर म्हटले आहे. शहा यांनी कोविंद यांचा विजय ऐतिहासिक असल्याचे मत व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय आता कोविंद यांचे आता विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

एनडीएसहित एनडीएबाहेरील राजकीय पक्षांनीही कोविंद यांना पाठिंबा दर्शविल्याने त्यांचा विजय जवळपास निश्‍चित मानला जात होता.

हा विजय अत्यंत भावूक करणारा क्षण असल्याची प्रतिक्रिया कोविंद यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली.

"राष्ट्रपती होण्याची मला कधीच आकांक्षा नव्हती; माझे ध्येयही अर्थातच हे नव्हते. डॉ. राजेंद्रप्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, अब्दुल कलाम यांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी ज्या पदाचा मान वाढविला, त्या पदासाठी माझी निवड होणे माझ्यासाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. या पदावर राहून देशाची सेवा करण्यासाठी मी प्रयत्नशील असेन. आज सकाळी दिल्लीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मला माझ्या गरिबीत गेलेल्या बालपणाची आठवण आली. आजच्या पावसातही माझ्यासारखे अनेक रामनाथ कोविंद भिजत असतील. हा देश तुमच्याबरोबर आहे, असे मला त्यांना सांगावयाचे आहे,'' असे कोविंद म्हणाले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: