नऊ महिन्याच्या बालिकेला रिक्षाबाहेर फेकून तिच्या आईवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

चालत्या रिक्षातून नऊ महिन्याच्या बालिकेला बाहेर फेकून तिच्या आईवर रिक्षातच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षातून बाहेर फेकल्याने नऊ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे.

गुरुग्राम (हरियाना) - चालत्या रिक्षातून नऊ महिन्याच्या बालिकेला बाहेर फेकून तिच्या आईवर रिक्षातच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षातून बाहेर फेकल्याने नऊ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी पतीशी झालेल्या किरकोळ भांडणामुळे एक महिला (वय 23) तिच्या नऊ महिन्याच्या बालिकेसह रिक्षातून खांडसा येथील तिच्या माहेरी निघाली होती. तीन प्रवासी बसलेल्या रिक्षातून तिने लिफ्ट घेतली. रिक्षात बसल्यानंतर इतर तिघांनी तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास विरोध केल्याने त्यांनी तिच्या नऊ महिन्याच्या बालिकेला रिक्षाबाहेर फेकले. या प्रकारात नऊ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला. त्यानंतर रिक्षाचालकासह इतरांनी मिळून महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

दिल्ली-गुरगाव महामार्गाजवळील जुन्या खांडसा रस्त्यावर रिक्षामध्येच आरोपींनी बलात्कार केल्याची तक्रार महिलेने पोलिसांकडे दिली. खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुरगाव येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.