बिहारमध्ये उंदरांना दारूची चटक!

उज्ज्वलकुमार
शुक्रवार, 5 मे 2017

ठाणे अंमलदारांच्या म्हणण्यात तथ्य आहे की नाही, याची चौकशी सुरू आहे. अंमलदारांचे म्हणणे खोटे ठरले तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. 
- नैयर हसनैन खान, पोलिस महानिरीक्षक, पाटणा 

पाटणा - बिहारमधील दारूबंदीचा कोणावर काय परिणाम झाला ही बाब वेगळी; पण या राज्यातील उंदीर दारूच्या अधीन झाले आहेत! हे वाचल्यावर कदाचित आश्‍चर्य वाटेल; पण या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. फक्त एवढेच की, उंदीर खरोखरच दारू पिऊ लागले आहेत की पोलिसांनीच त्यांची निष्क्रियता उंदरांवर ढकलली आहे, याची चौकशी होत आहे. 

पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज यांनी आयोजित केलेल्या गुन्हेविषयक बैठकीत हा विषय एकदम चर्चेला आला. उंदरांना दारूची चटक लागल्याची तक्रार एका ठाणे अंमलदाराने केल्यावर सगळ्यांना धक्काच बसला. पोलिसांच्या मालखान्यात (जप्त केलेल्या वस्तू ठेवण्याची जागा) ठेवलेल्या दारूच्या बाटल्या उंदीर खाली पाडून फोडतात आणि त्यातील दारू पितात, असा या ठाणे अंमलदाराचा दावा आहे. जप्त करून मालखान्यात ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांची संख्या कमी होत असल्याचे आढळल्यावर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. अंमलदार महाशयांच्या उंदरांबाबतच्या दाव्यामागचे हे एक कारण आहे. जप्त केलेल्या बाटल्यांची संख्या कमी का झाली, अशी विचारणा केल्यावर पोलिसांनी उंदरांनाच दारूची चटक लागल्याचे कारण पुढे केले आहे. एवढेच नव्हे, तर मालखान्यात सीलबंद करून ठेवलेल्या दारूच्या सर्व बाटल्या उघडून उंदरांनी सर्व दारू फस्त केल्याचाही पोलिसांचा दावा आहे. खुद्द मनू महाराज यांना हे कारण ऐकविण्यात आले. व्यवस्थित न ठेवल्यामुळे दारूच्या काही बाटल्या फुटून गेल्याचेही चौकशीत आढळले आहे. 

बिहारमध्ये गेल्या वर्षी पाच एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात आल्यापासून घालण्यात आलेल्या छाप्यांत 5.11 लाख लिटर विदेशी दारू, 3.01 लाख लिटर देशी दारू आणि 12 हजार लिटर बिअर असा साठा जप्त करण्यात आला आहे. ही जप्त केलेली दारू संबंधित पोलिस ठाण्यांच्या मालखान्यांत ठेवण्यात आली आहे. 

ठाणे अंमलदारांच्या म्हणण्यात तथ्य आहे की नाही, याची चौकशी सुरू आहे. अंमलदारांचे म्हणणे खोटे ठरले तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. 
- नैयर हसनैन खान, पोलिस महानिरीक्षक, पाटणा