राममंदिरासाठी तुरुंगातही जाऊ; केंद्रीय मंत्री उमा भारती यांची गर्जना

पीटीआय
रविवार, 9 एप्रिल 2017

अयोध्याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर भाष्य करण्यास नकार देत ज्येष्ठ भाजप नेत्या आणि केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन खात्याच्या मंत्री उमा भारती यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आपण सर्वस्व द्यायला तयार आहोत, असे म्हटले आहे.

लखनौ - अयोध्याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर भाष्य करण्यास नकार देत ज्येष्ठ भाजप नेत्या आणि केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन खात्याच्या मंत्री उमा भारती यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आपण सर्वस्व द्यायला तयार आहोत, असे म्हटले आहे.

राममंदिर हा आमच्या श्रद्धेचा विषय असून, त्यासाठी आपण वेळ पडलीच तर तुरुंगातदेखील जाऊ, फासावर लटकण्याची वेळ आली तर त्यासाठीसुद्धा मागे पुढे पाहणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या विषयावर भाष्य केले.

आम्हाला राममंदिराच्या मुद्यावर चर्चा करायचे कारणच नाही, कधीकाळी योगी आणि मी या चळवळीचा एक भाग होतो. योगी आदित्यनाथ यांचे गुरू महंत अवैद्यनाथ हे या चळवळीचे प्रमुख होते. सध्या हा विषय न्यायालयाच्या विचाराधीन असल्याने आपण यावर भाष्य करणार नाही, असे सांगत त्यांनी "तोंडी तलाक'च्या मुद्यावर नाराजी व्यक्त केली. ही प्रथा मानवतेच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले.