'भाजप भगाओ, देश बचाओ' रॅलीला तुफान प्रतिसाद

वृत्तसंस्था
रविवार, 27 ऑगस्ट 2017

लालूप्रसाद यादव यांनी भाजपविरोधात आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, जनता दल युनायटेडचे शरद यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा आदी नेते सहभागी झाले आहेत. 

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात आयोजित केलेल्या 'भाजप भगाओ, देश बचाओ' रॅलीला तुफान प्रतिसाद मिळत असून लाखो नागरिक गांधी मैदानावर उपस्थित होते.

लालूप्रसाद यादव यांनी भाजपविरोधात आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, जनता दल युनायटेडचे शरद यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा आदी नेते सहभागी झाले आहेत. 

राजा यांनी शनिवारीच आमचा पक्ष पाटण्यातील रॅलीत सहभागी होणार आहे. ही रॅली फॅसिस्ट शक्तींविरोधात आहे. तसेच ती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आहे. फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. जनतेला या शक्तींना तोंड देण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे, असे म्हटले होते.  

भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रोखण्यासाठी समचविचारी पक्षांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने पाटण्यात लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने "भाजप भगाओ, देश बचाओ' रॅली आयोजित केली आहे.