माजी नगरसेवकाकडे सापडल्या 40 कोटींच्या जुन्या नोटा

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

एका माजी नगरसेवकाकडून चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या तब्बल चाळीस कोटी रुपये किंमतीचा नोटा सापडल्या आहेत.

बंगळूर - एका माजी नगरसेवकाच्या निवासस्थानावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या तब्बल चाळीस कोटी रुपये किंमतीचा नोटा सापडल्या आहेत.

पोलिसांनी शुक्रवारी सेंट्रल बंगळूरमधील श्रीरामपूर येथील नागराज यांच्या निवासस्थानी छापा टाकला. याबाबत माहिती देताना हेन्नूर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक एन श्रीनिवास यांनी सांगितले की, "माजी नगरसेवक नागराज यांच्या निवासस्थानी आम्हाला बेकायदा रोख रक्कम आढळली. न्यायालयाच्या वॉरंटनुसार टाकलेल्या छाप्यात आम्ही त्यांच्या निवासस्थानावरून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.'

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर काळा पैसा पांढरा करून देण्याच्या प्रकरणात नागराज सहभागी असल्याचा आरोप आहे. एका व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी मागण्याचा त्याच्यावसर आरोप आहे. याशिवाय बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. प्रकाशनगर मतदारसंघातून 2002 साली नागराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला होता. त्याने 2013 सालीही निवडणूक लढविली होती. मात्र त्यात पराभव पत्कारावा लागला होता.