'राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाही'; मोहन भागवत यांचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचे संकेत शिवेसेनेने दिले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र 'आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाहीत' असे म्हणत भागवत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचे संकेत शिवेसेनेने दिले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र 'आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाहीत' असे म्हणत भागवत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

मंगळवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भागवत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भागवत यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. ते म्हणाले की, "देशात हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. हिंदुत्ववादी राष्ट्राच्या उभारणीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने, प्रामुख्याने भाजपने सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले पाहिजे.' तर "याबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.'

अडवानी आणि ठाकरे कुटुंबाचे अत्यंत जवळचे संबंध असताना राऊत यांच्या वक्तव्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र भागवत यांनी स्पष्टीकरण दिल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.