दोन रशियन नागरिक अनावधनाने पोचले मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

मुंबई - समुद्र पर्यटनाच्या निमित्ताने प्रवासाला निघालेले दोन रशियन नागरिक भारताच्या जमिनीवर प्रवेश करण्याची परवानगी नसताना नौदल आणि तटरक्षक दलाच्या कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांच्या नौकेसह मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई - समुद्र पर्यटनाच्या निमित्ताने प्रवासाला निघालेले दोन रशियन नागरिक भारताच्या जमिनीवर प्रवेश करण्याची परवानगी नसताना नौदल आणि तटरक्षक दलाच्या कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांच्या नौकेसह मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या दोन रशियन नागरिकांकडील अन्न आणि पाणी संपल्याचे त्यांना लक्षात आले. त्यामुळे ते अरबी समुद्रातून मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले. या दोघांमध्ये एक पुरुष (वय 45) आणि एक स्त्री (वय 39) असून ते दोघेही पती-पत्नी आहेत. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्यावर त्यांनी स्थानिक मच्छिमारांकडे मदतीसाठी धाव घेतली. मात्र त्यांची भाषा न समजल्याने आणि संशयास्पद वाटल्याने स्थानिकांनी याबाबत मुंबई पोलिसांना कळविले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या दोघांना त्यांच्या नौकेसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एका वॉकी-टॉकीशिवाय काहीही संशयास्पद सापडले नाही. पोलिसांनी या दोघांच्या ओळखपत्राची खात्री पटवली आणि रशियन दूतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर या दोघांनाही त्यांच्या नौकेसह सोडून देण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना पोलिस अधिकारी म्हणाले, "हे दांपत्य वर्षभरापूर्वी समुद्रपर्यटनासाठी निघाले होते. त्यांच्याकडे भारताच्या पाण्यात (समुद्रात) प्रवेश करण्याची अनुमती होती. मात्र जमिनीवर प्रवेश करण्याची अनुमती नव्हती. ते चुकून भारतात आले. रशियन दूतावासाकडे चौकशी करून खात्री केल्यानंतर त्यांची स्वच्छ पार्श्‍वभूमी असल्याचे समजले.'

मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईमधील समुद्रकिनारा संवेदनशील परिसर घोषित करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "समुद्रातून भारताच्या जमिनीवर मोठ्या नौकेसह पोहोचलेल्या दांपत्यामुळे आम्हाला धक्का बसला. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला हुलकावणी देत ते भारतात पोहोचले. ही धोक्‍याची घंटा आहे. याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.'