Rahul Gandhi, Sonia Gandhi
Rahul Gandhi, Sonia Gandhi

मेकओव्हर हवा काँग्रेसचा, राहूल गांधींचा

राजकारणाच्या सारीपाटात घराणेशाहीचा शिक्का बसलेल्या गांधी कुटुंबाचा वारसदार राहुल गांधी यांना पक्षांतर्गत सर्वोच्च स्थानी बसविण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना मिळेलही. गोंधळलेला विरोधक, अशी भाजपने करून ठेवलेली प्रतिमा बदलण्याची ही राहुल गांधी यांना संधी आहे. नव्या जबाबदारीत राहुल ही संधी साधतील का?

काँग्रेस आणि सामान्य माणसाशी जोडलेली नाळ हे भारतात शतकाहून अधिक काळचे समीकरण. पण, हीच नाळ गेल्या लोकसभा निवडणुकीपासून तुटताना दिसत आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नंतर काही प्रमाणात सोनिया गांधी यांच्याबाबत देशभरातील नागरिकांना आपले नाते दृढ वाटत होते. याला काही कारणेही तशीच होती. 2003 मध्ये काँग्रेसचे खासदार पंतप्रधानपद स्वीकारण्यासाठी सोनिया गांधी यांना विनवणी करत होते. पण, त्यांना ज्येष्ठ नेते आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांना प्राधान्य दिले. त्यावेळी फिलगुडचे वातावरण असतानाही आणि अटलबिहारी वाजपेयींसारखे मातब्बर नेते असतानाही काँग्रसने भाजपला शह दिला. त्या पुढच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता बळकट केली. मात्र, त्याच दरम्यान संघटनेत फरक पडत गेला. पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत होत गेली. आता राहुल गांधी यांच्याभोवती काँग्रेस केंद्रीत झाली आहे.

राहुल गांधी यांना 2013 मध्ये काँग्रेसचे उपाध्यक्षपद दिल्यापासून त्यांच्याकडे पक्षाचा अध्यक्षपदाचा चेहरा आणि काँग्रेसचे भविष्य म्हणून पाहिले जाऊ लागले. राहुल यांना उपाध्यक्षपद मिळाल्यापासून ते सतत सामान्य नागरिकांमध्ये मिसळून प्रश्न जाणून घेताना दिसत आहेत. शेतकऱ्यांसाठी जवळपास त्यांनी देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये मोर्चा काढत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. गरीब कुटुंबाच्या घरी जाऊन जेवण करण्याचे त्यांची पद्धत जगजाहीर आहे. याबरोबरच वादग्रस्त देशविरोधी घोषणांमुळे चर्चेत आलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाला (जेएनयू) दिलेली भेट, हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुलाला न्याय मिळण्यासाठी केलेले आंदोलन आणि नुकतेच वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावरून माजी सैनिकाने केलेल्या आत्महत्येमुळे केलेले आंदोलन हे राहुल गांधी यांच्यासाठी उपाध्यक्षपदाच्या काळातील चर्चेत राहणारे मुद्दे म्हणता येईल.

धर्मनिरपेक्षता की हिंदुत्ववाद

धर्मनिरपेक्षतेच्या नावावर पक्षाची वाटचाल करणाऱ्या काँग्रेसला हिंदूत्ववादाला उघड जवळ करणे कधी जमले नाही आणि परवडणारेही नाही. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचे काम विरोधी पक्षांनी व्यवस्थितरित्या पार पाडले. काँग्रेस आजही उजव्या विचारसरणीचा उघड पुरस्कार करणाऱया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांचा प्रमुख विरोधक आहे. राहुल यांनी पक्षाची ही विचारधारा भक्कम करण्याचे ठरविले आहे.

मोदी एके मोदी नको
मौत के सौदागर आणि आता खून के दलाल अशा उपमा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा आणखी मोठी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी आता मोदींपलिकडे जाऊन त्यांनी दिलेल्या आश्वासनांना लक्ष्य बनविले गरजेचे बनले आहे. 2014 लोकसभा निवडणुकीवेळी मोदी एके मोदी करत काँग्रेसने राबविलेली मोहिम आता त्यापलिकडे जाऊन देशव्यापी बनली पाहिजे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब आणि गुजरात या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपच्या विकासाच्या मॉडेलला लक्ष्य बनवून केलेला प्रचार गाजणार आहे. मोदींनी लोकप्रियतेचा कळस गाठत, प्रसिद्धी कशी मिळवावी याची जणू व्याख्याच करून ठेवली आहे. आता याच प्रसिद्धीच्या कसोटीवर राहुल गांधी यांनी स्वतःची ओळख बनविणे गरजेचे बनले आहे. भाजपने सतत काँग्रेसच्या धोरणांना लक्ष्य बनवत नागरिकांमध्ये आपले स्थान बळकट केले. आता याच मार्गावर जाऊऩ काँग्रेसने भाजपच्या अच्छे दिन आणि 15 लाख बँक खात्यावर जमा करण्यासारख्या आश्वासनांवर टीकेचे झोड उठवून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आहे. यात राहुल गांधींनी पुढाकार घेत देशव्यापी चळवळ निर्माण केली तरच त्यांच्या सत्तांतराचा फायदा काँग्रेसला 2019 लोकसभा निवडणुकीत पहायला मिळेल.

सोशल मिडीयातही मागेच

काँग्रेसची सलग दहा वर्षांची सत्ता बदलण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सोशल मीडीयाला ओळखण्यात काँग्रेसला आजही अपयशच आल्याचे दिसते. एकीकडे एकही पत्रकार परिषद न घेता सरकारच्या सर्व निर्णयांची आणि धोरणांची माहिती सोशल मीडीयावरून देणाऱ्या पंतप्रधान मोदींचा बचाव करण्यासाठी भाजपचा सोशल मीडीया सेल सज्ज आहे. दुसरीकडे याच निर्णयांना लक्ष्य करणाऱ्या सोशल मिडीयातील युजर्सची संख्याही मोजकी आहे. उजव्या विचारसरणीची मंडळी हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कर्ता असलेल्या सरकारच्या निर्णयाच्या बचावासाठी तात्काळ ऍक्टीव होतात. पण, याचउलट चित्र सरकारकडून होणाऱ्या चुकांबाबत आणि मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांवर तीव्रपणे सोशल मिडीयाच्या प्लॅटफॉर्मवर दिसत नाही. राहुल गांधी या बाबतीतही तसे उशीराच ऍक्टीव झाले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर साधारण: वर्षभरानंतर @officeofRG या नावाने राहुल गांधी ट्विटरवर आले. स्ट्रॅटेजिस्टची मदत घेऊन आपली प्रतिमा निर्माण करणाऱ्या राहुल गांधींना आता सोशल मिडीयात आपली ओळख निर्माण करण्याची गरज बनली आहे. ज्या माध्यमामुळे काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले, तेच अद्याप पूर्णपणे ओळखू न शकलेल्या काँग्रेसला तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या करण्याची जबाबदारी राहुल गांधींवर असणार आहे.

प्रतिमा बदलण्याचे आव्हान

राहुल गांधी यांच्या प्रतिमेबाबत देशभरात विविध नावउल्लेखांवरून खिल्ली उडविली जाते. याला प्रमुख कारणे विरोधी पक्षांकडून सोयीस्कररित्या करण्यात आलेला प्रचार आणि घराणेशाहीबद्दल लोकांमध्ये असलेली चीड म्हणता येईल. काँग्रेसची यंग ब्रिगेड म्हणून राहुल यांच्याकडे पाहिले जाते. याचा थेट फायदा अद्यापही राहुल गांधी यांना घेता आलेला नाही. राहुल व ज्योतिरादित्य शिंदे वगळले तर एकही युवा नेता काँग्रेसमध्ये पुढे दिसत नाही. काँग्रेसचा मेकओव्हर करण्यासाठी राहुल गांधी यांनी युवा पिढीला विश्वास देत स्वतःच्या प्रतिमेचाही मेकओव्हर करण्याची परिस्थिती सध्या आहे. सोशल मीडीयावरून त्यांच्या प्रतिमेबद्दल विनोद होतच राहणार, पण जो बदल त्यांना करायचा आहे तो कृतीतून केल्याशियात दुसरा पर्याय उरत नाही.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, ए. के. अँटनी, गुलामनबी आझाद, पी. चिदंबरम यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना घेऊन काँग्रेसचे युवा नेतृत्व तयार करण्याची जबाबदारी राहुल गांधी यांच्याकडे आली आहे. पक्षाचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता राहुल गांधी यांच्यामध्ये आहे की नाही हा येणारा काळच ठरवेल. पण, पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचा महाप्रताप त्यांना करावा लागणार आहे. तरच खऱ्या अर्थाने सत्तांतराच्या या प्रक्रियेत राहुल गांधी आपली वारसदाराची ओळख मिटवून काँग्रेसला पुन्हा सत्तेजवळ नेऊ शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com