युद्धाचे आदेश देणाऱ्यांना लढायला पाठवावे: सलमान खान

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

युद्धामुळे कोणालाही फायदा होणार नाही. दोन्ही देशांमधील समस्यांवर युद्ध हा उपाय नव्हे, असे सांगत पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्याची आवश्‍यकता आहे.

मुंबई  अभिनेता सलमान खान हा त्याच्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत असतो. भारत-पाकिस्तानदरम्यान सीमारेषेवरील तणावावर भाष्य करताना आता सलमानने "युद्धाचे आदेश देणाऱ्यांना लढायला पाठवावे', असे म्हटले आहे. दोन्ही देशांदरम्यान शांतता प्रस्थापित होण्याचे प्रयत्न व्हावेत, असेही सलमान या वेळी म्हणाला.

युद्धामुळे कोणालाही फायदा होणार नाही. दोन्ही देशांमधील समस्यांवर युद्ध हा उपाय नव्हे, असे सांगत पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्याची आवश्‍यकता आहे, असे मत सलमानने एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सलमान इतकेच बोलून थांबला नाही, तर जे लोक युद्धाचा आदेश देतात, त्यांच्या हातात बंदुका देऊन त्यांना प्रत्यक्ष सीमारेषेवर लढायला पाठवावे. जेव्हा ते लोक गुडघ्यावर येतील, तेव्हा सर्व वाद आपोआप मिटतील, असेही सलमान म्हणाला. युद्धामुळे दोन्ही देशांचे सैन्य नाहक मारले जाते. या सैनिकांची कुटुंबे असहाय होतात, असेही सलमान म्हणाला.

सलमान खान त्याच्या आगामी ट्युबलाइट चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आला असताना हे वक्तव्य केले. ट्युबलाइट हा सिनेमा 1962 मध्ये घडलेल्या भारत-चीनदरम्यानच्या युद्धावर आधारित आहे. याआधी सलमानने बलात्कार पीडितांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते.