तारणहाराच्या शोधात जनमानस

तारणहाराच्या शोधात जनमानस
तारणहाराच्या शोधात जनमानस

एक क्रूर राक्षस असतो. तो लोकांना नेहमी त्रास देत असतो. त्याच्या त्रासापासून मुक्त करण्या साठी एक राजकुमार येतो. राक्षसाशी लढाई करून तो त्या दुष्ट राक्षसाचा वध करतो... अशा गोष्टी आपण सदचममळनीच लहान असताना ऐकलेल्या आहेत. त्यामुळे संकटातून सोडवणाऱ्या त्या राजकुमाराचे किंवा कोणत्याही समस्या चुटकीसरशी दूर करणाऱ्या हिरोचे आकर्षण आपल्या मनात खोलवर असतेच असते.


आपल्या व्यक्तिगत समस्या कोणीतरी येऊन चुटकीसरशी सोडवाव्यात,या अपेक्षेत वरकरणी आक्षेपार्ह असे काही नाही; मात्र खरा प्रश्न तेव्हा निर्माण होतो, जेव्हा ही मानसि कता सामाजिक स्वरूपात पक्की होत जाते. म्हणजे रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजा सोडविण्यासाठीही आपल्याला हिरो पाहिजे असतो. सार्वजनिक व्यवहार सुरळीत चालवण्यासाठी हिरो हवा असतो. कारण, एकदा हा हिरो आला की आपली जबाबदारी संपते. त्याला शरण जायचे, म्हणजे बदल घडविण्यासाठी जे काही करावयाचे ते हिरोने करायचे, त्यात आपले काहीच योगदान नको. भारताच्या राजकीय क्षेत्रात व्यक्तिवादी राजकारणाबद्दल नेहमीच टीका होत आलेली आहे. सारेच त्या बद्दल बोलत असतात; मात्र परिस्थिती अशी आहे की, आपल्या शरण जाण्याच्या सवयीने पक्षही राजकीय घराण्यांना शरण जात असतात. तेच आपले निवडणुकीतले तारणहार ठरतील असे त्यांना वाटते.

याला कारण म्हणजे जनतेच्या मनातील "हिरोवर्शिप'. तो हिरो किंवा त्याचा मुलगा, मुलगी, पत्नी, नातू अशा सगळ्यांकडे ती हिरोगिरी वंशपरंपरागत चालत येते; पण गंमत अशी की, स्वपक्षातील हे "कौटुंबिक जिव्हाळ्याचे'हिरो सर्वांना आवडतात. दुसऱ्या पक्षातील हिरोंना मात्र ते व्हिलन ठरवून मोकळे होतात; पण हे हिरोही कसे वेगवेगळे असतात याची काही वेगवेगळी उदाहरणे आपल्या समोर आहेत. पहिले उदाहरण नुकतेच निधन पावलेले क्‍युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल केस्ट्रो. केस्ट्रो असे सांगत, की मी गेल्यावर, माझे निधन झाल्यावर कुठेही माझे नाव देऊ नका. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी स्वत:चेच पुतळे निर्माण केल्याची घटनाही फारशी जुनी नाही. अम्मांच्या तमिळनाडूत तर त्यांच्या नावाने निर्माण केलेल्या उत्पादनांची आणि योजनांची मोठी यादीच आहे. या सर्व बाबींतून एकच गोष्ट प्रकर्षाने समोर येते व ती म्हणजे व्यक्तिकेंद्रित राजकारण.


त्यावर पुन्हा विरोधी पक्षातील व्यक्तिकेंद्रित राजकारणाच्या नावाने फोडले जाणारे खडे. हे सार्वजनिक स्वरूपातील ढोंग भारतीय राजकारणात सर्रास होते.
भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने ही मोठीच समस्या असल्याचे जाणवते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शिक्षण व्यवस्था मजबूत करायला हवी. आपला तारणहार कुणी व्यक्ती नसून आपली सद्‌सद्विवेकबुद्धी आहे हे त्यांच्या लक्षात येण्याजोगी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. त्यासाठी साऱ्यांना प्राथमिक शिक्षणापासून नागरिक शास्त्राचे शिक्षण देणे आवश्‍यक आहे. प्रत्येक नागरिकाने स्वत:चे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायला हवे ही शिकवण विद्यार्थ्यांमध्ये रुजली गेली पाहिजे. तरच व्यक्तिमाहात्म्य वाढवण्यास आळा बसू शकतो.


नेतेमंडळींच्या अस्मितेच्या राजकारणास पायबंद घातला जाऊ शकतो. महाविद्यालयीन स्तरावर नागरिकशास्त्र हा अनिवार्य विषय असला पाहिजे. राष्ट्रीय संस्कार रुजविण्याचा हा सर्वांत प्रभावी मार्ग आहे. अन्यथा भारतीय लोकशाहीत मतपेटीतूनही राजाच निर्माण होईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com