'सप'ची सूत्रे मुलायमसिंहांकडे दिली नाहीत तर नवा पक्ष : शिवपाल

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

अखिलेश यादव यांनी तीन महिन्यांच्या आत नेताजींकडे (मुलायमसिंह) पक्षाची सूत्रे सोपविण्याचे आपले आश्‍वासन पूर्ण करावे; अन्यथा मी नवा पक्ष स्थापन करण्याच्या दृष्टीने धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करेन.

लखनौ - समाजवादी पक्षाची सूत्रे मुलायमसिंह यांच्याकडे सोपविली गेली नाहीत तर नवा पक्ष स्थापन करण्याचा इशारा पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री शिवपालसिंह यादव यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना बुधवारी दिला. 

समाजवादी पक्षात भांडणे सुरू असतानाच शिवपाल यांनी निवडणुकीनंतर वेगळा पक्ष स्थापन करणार असल्याचे म्हटले होते. निवडणुकीनंतर मात्र त्यांच्याकडून कसल्याच हालचाली घडल्या नाहीत. निवडणुकीच्या 2 महिन्यांनंतर त्यांनी पुन्हा या मुद्यावर बोलायला सुरवात केली आहे. 

शिवपाल म्हणाले की, अखिलेश यादव यांनी तीन महिन्यांच्या आत नेताजींकडे (मुलायमसिंह) पक्षाची सूत्रे सोपविण्याचे आपले आश्‍वासन पूर्ण करावे; अन्यथा मी नवा पक्ष स्थापन करण्याच्या दृष्टीने धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करेन. अखिलेश यांनी स्वत: तीन महिन्यांची मुदत मागितली होती आणि म्हटले होते, की या काळात पक्ष आणि पद पुन्हा नेताजींकडे परत करू. अखिलेश यांनी आपले आश्‍वासन पूर्ण करावे. 

शिवपाल यांनी या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, भ्रष्ट अधिकारी भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांशी थेट भागीदारी करतात, त्या वेळी राज्याची स्थिती अतिशय वाईट होते. आमच्या मागील सरकारमध्येही तसेच झाले आणि तोच प्रकार आताही सुरू आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांच्या काळात सत्तेच्या धुंदीत चांगल्या लोकांवर अन्याय केला गेला.