‘यूपी’त रथयात्रेला ‘समाजवादी’ एकजूट

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

अखिलेश, शिवपाल एकाच व्यासपीठावर; महाआघाडीचा निर्णय नेताजी घेणार

लखनौ - समाजवादी पक्षातील अंतर्गत ‘यादवी’च्या पार्श्‍वभूमीवर आजपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री अखिलेश यांच्या बहुचर्चित ‘विकास से विजय की ओर’ रथयात्रेच्या निमित्ताने यादवकुळाने एकीचे दर्शन घडविले. अखिलेश यांच्या विकास रथयात्रेला समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी हिरवा कंदील दाखविला. विशेष म्हणजे या वेळी अखिलेश यांचे काका शिवपाल हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. 

अखिलेश, शिवपाल एकाच व्यासपीठावर; महाआघाडीचा निर्णय नेताजी घेणार

लखनौ - समाजवादी पक्षातील अंतर्गत ‘यादवी’च्या पार्श्‍वभूमीवर आजपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री अखिलेश यांच्या बहुचर्चित ‘विकास से विजय की ओर’ रथयात्रेच्या निमित्ताने यादवकुळाने एकीचे दर्शन घडविले. अखिलेश यांच्या विकास रथयात्रेला समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी हिरवा कंदील दाखविला. विशेष म्हणजे या वेळी अखिलेश यांचे काका शिवपाल हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. 

कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना अखिलेश यांनी ऐक्‍याची ग्वाही दिली. समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशात जातीयवादी शक्तींना पूर्ण ताकदीनिशी रोखेल. हा रथ जसजसा पुढे जाईल तसतसे पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते एकवटतील. राज्यातील प्रस्तावित महाआघाडीबाबत मला काहीही महिती नसून नेताजीच याबाबत योग्य तो निर्णय घेतील. आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. आझमखान, रामगोपाल यादव हे माझ्यासोबत नसले तरीसुद्धा त्यांचा आशीर्वाद मात्र माझ्यासोबत आहे. या रथयात्रेच्या प्रवासासोबत सर्व पक्षभेद मिटून जातील आणि राज्यातील समाजवादी एकत्र येतील. माझा कोणावरही राग नाही, तसे अन्य कोणाचा माझ्यावर राग असेल असेही मला वाटत नाही असे सांगत अखिलेश यांनी काका शिवपाल यांना टोला लगावला. राज्यातील निवडणूक राष्ट्रीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकेल. आता परत आमची सत्ता येण्याची वेळ असल्याचे अखिलेश यांनी नमूद केले. या वेळी शिवपाल यादव यांनीही अखिलेश यांना शुभेच्छा दिल्या. 

अखिलेश यांचा रथ
लाल रंगातील या हायटेक ५ कोटी रुपयांच्या या रथावर (बस) मुलायम, अखिलेश यांच्यासह राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण आणि जनेश्‍वर मिश्रा यांची छायाचित्रे आहेत. बसच्या उर्वरित १०.५ मीटर भागावर सरकारी योजनांची माहिती देण्यात आली आहे.

बसच्या दोन हायड्रॉलिक्‍स पॅनेल्सवर काही लाउडस्पीकर बसविण्यात आले असून, याद्वारे अखिलेश यांना लोकांना उद्देशून भाषण करता येईल. राज्य सरकारने तयार केलेले विशेष गाणीही या स्पीकरच्या माध्यमातून वाजविले जाईल.

अखिलेश यांच्या रथास हायड्रॉलिक शाफ्ट बसविण्यात आला असून, तो बसच्या छपरापासून पाच फुटांपर्यंत उंच होऊ शकतो. बसची उंची १५ फूट असल्याने अखिलेश यांना २० फुटांपेक्षा अधिक उंचीवरून सभेला उद्देशून भाषण करता येईल.

या बसच्या काचा बुलेटप्रूफ असून, त्यामध्ये सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्येच मुख्यमंत्र्यांचे छोटेसे कार्यालय असून, त्यात ते पाच सहा लोकांसोबत बैठक घेऊ शकतील.

बसच्या उर्वरित भागामध्ये स्वयंपाक घर, वॉशरूमचाही समावेश आहे. या बसमध्ये चोवीस तास ‘४-जी’ कनेक्‍शन असल्याने स्वत: मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर ॲक्‍टिव्ह राहता येईल. याच बसवर एलइडी स्क्रीनदेखील बसविण्यात आल्या आहेत.

समाजवादी पक्षाची रथयात्रा ही इमेज मेकओव्हरसाठी असून, मागील पाच वर्षांमध्ये या सरकारने कोणतेच काम केलेले नाही. सध्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे.
- सुधींद्र भदोरिया, बसपचे नेते

समाजवादी पक्षाची दोन चाके अखिलेश आणि शिवपाल परस्परांविरोधात फिरायली लागली आहेत. यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय आहे.
- महेश जुन्नरकर, वाचक

मुलायम बोल..
मुलायमसिंह यांनी भाषणामध्ये घोषणाबाजीमुळे काही होणार नसल्याचे सांगत ही रथयात्रा यशस्वी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. आम्हाला पाकिस्तानसोबत संघर्ष नको असून, भारत सरकारने मधल्या मार्गाचा अवलंब करावा, असे मत त्यांनी मांडले. अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला तरच खरे परिवर्तन होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

रथ झाला फेल
अखिलेश यांच्या बसने अवघे एक किलोमीटरचे अंतर पार केले नाही, तोच त्यात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे त्यांना पुढील प्रवासासाठी कारचा आधार घ्यावा लागला. मर्सिडीज कंपनीने अखिलेश यांच्या रथयात्रेसाठी ही बस तयार केली आहे. अखिलेश यांची पहिल्या टप्प्यातील रथयात्रा लखनौ ते उन्नाव जिल्ह्यातील शुक्‍लागंज दरम्यान असेल. या टप्प्यात ७५ कि.मी.चे अंतर पार करण्यात येईल. पाच नोव्हेंबर रोजी समाजवादी पक्षाचा रौप्यमहोत्सव असून, या कार्यक्रमासाठी अखिलेश परत लखनौमध्ये येतील. रथयात्रेचा दुसरा टप्पा ७ नोव्हेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे.

Web Title: samajwadi party join for rathyatra in up