'योगी जिंदाबाद' म्हणणाऱ्या मुलाची सप नेत्याकडून हत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

'योगी जिंदाबाद' अशी घोषणा दिल्याने एका किशोरवयीन मुलाची समाजवादी पक्षाच्या नेत्याने गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी ही हत्या घोषणाबाजीमुळे नव्हे तर पूर्ववैमनस्यातून झाल्याचे म्हटले आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) -  'योगी जिंदाबाद' अशी घोषणा दिल्याने एका किशोरवयीन मुलाची समाजवादी पक्षाच्या नेत्याने गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी ही हत्या घोषणाबाजीमुळे नव्हे तर पूर्ववैमनस्यातून झाल्याचे म्हटले आहे.

मोरादाबाद जिल्ह्यातील सांबाल येथील माधन गावात रविवारी ही धक्‍कादायक घटना घडली. भारतीय जनता पक्षाचे नेते मोनू सिंह यांचा भाऊ विनिकेत ऊर्फ नन्हे (वय 17) रविवारी 'योगी जिंदाबाद' अशी घोषणा देत होता. त्याचवेळी समाजवादी पक्षाचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य उषा राणी यांचे पती शिशुपाल सिंह तेथून जात होते. त्यावेळी शिशुपालने घोषणा ऐकल्या आणि नन्हेवर गोळी झाडली. त्यानंतर काही वेळाने नन्हेच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. त्यामध्ये घरातील तीन जण जखमी झाले.

नन्हेच्या भावाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे शिशुपाल हा मोनूची हत्या करण्यासाठी आला होता. नन्हेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. घोषणा दिल्यामुळे नव्हे, तर मतदानासंबंधित वादातून निर्माण झालेल्या शत्रुत्वामुळे नन्हेची हत्या झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.