काँग्रेस तुम्हाला घेऊन बुडेल- मोदींचा 'सप'ला इशारा

पीटीआय
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मोदी म्हणाले, 'लोकशाहीच्या मार्गाने निवडून दिलेल्या सरकारकडून जनतेला अनेक अपेक्षा असतात.'

बहराईच (उत्तर प्रदेश) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी केलेली आघाडी ही तुमच्यासाठी (समाजवादी पक्ष) एक विवशता होती. निकालानंतर काँग्रेस पक्ष तुम्हाला सोबत घेऊन बुडाल्याचे स्पष्ट होईल, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. या आघाडीच्या निमित्ताने 27 वर्षे राज्याला वाऱ्यावर सोडणारे व त्यासाठी टीका करणारे दोन पक्ष एकत्र आले असून, आता राज्याचे काय होणार, असा सवालही मोदींनी उपस्थित केला आहे.

येथे झालेल्या एका सभेत ते बोलत होते. मोदी म्हणाले, 'लोकशाहीच्या मार्गाने निवडून दिलेल्या सरकारकडून जनतेला अनेक अपेक्षा असतात. उत्तर प्रदेश सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असून, आपल्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सरकारने अद्याप जनतेसमोर मांडलेला नाही. सपचे सरकार म्हणजे एक असे वाहन आहे की त्याचा हॉर्न सोडून सगळे वाजते. त्यांची कामे नव्हे; तर कारनामेच अधिक बोलतात.''

उत्तर प्रदेशमधील जनता धमक्‍या, आमिषांकडे पाठ करून एकत्र येऊन भाजपला मतदान करत आहे. ज्यांनी ज्यांनी मतदान केले त्यांचा मी आभारी आहे. येथे भाजपचे सरकार आले, तर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीतच शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जातील, असे आश्वासन मोदींनी दिले. बहराईचची ओळख आज वाळूमाफिया, गुंडाराज अशी झाली असून, येथील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. महिला, मुलींना एकटे बाहेर पडणे मुश्‍किल होऊन बसले आहे. पोलिस ठाणी समाजवादीची कार्यालये होऊन बसली आहेत, असे मोदींनी निदर्शनास आणून देत 'सप'वर चौफेर हल्ला चढविला.