लाल दिवा गेला...'प्रेस,' 'पोलिस'ही घालवा...

संतोष धायबर
सोमवार, 24 एप्रिल 2017

पंतप्रधानांच्या निर्णयामुळे लाल दिवा तर गेला आहे. परंतु, विविध मोटारींवर Press, Police असेही लिहिलेले पहायला मिळते. परिवहन कायद्याच्या नियमानुसार हे लिहिण्यास परवानगी नाही. परंतु, अनेकांच्या वाहनावर हे लिहिलेले दिसते. लाल दिव्याप्रमाणेच हे सुद्धा घालविण्याची वेळ आली आहे. यामागचे कारण म्हणजे अनेकजण Press, Police च्या नावाखाली नियमांची पायमल्ली करताना दिसतात. आपण नियम पाळत असलो अथवा आपली स्वतःची ओळख असेल तर हे लिहीण्याची गरजच काय?

लाल दिव्याच्या गाडीची 'व्हीआयपी संस्कृती' संपविण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी घेतला आणी सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक वाटणारी 'लाल बत्ती' गुल झाली. आता 'लाल बत्ती'प्रमाणेच विविध वाहनांवर असलेली 'प्रेस', 'पोलिस', 'अध्यक्ष' ही नावेही हद्दपार केली पाहिजेत, असं वाटतं.

पंतप्रधान मोदी यांनी लाल लाल दिव्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे 1 मेपासून देशातील सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना वाहनांवर लाल दिवा वापरता येणार नाही. हा चांगला निर्णय आहे. सर्वसामान्य नागरिकांनी या निर्णयाचे स्वागतच केले. धन्यवाद मोदी !

कित्येक वर्षांपासून आपण रस्त्यांवरून अति वेगात धावणारी लाल दिव्याची गाडी आणि ताफा पाहात आलो आहोत. हा ताफा आला की आपण मुकाटपणे बाजूला व्हायचे अन् त्यांना रस्ता मोकळा करून द्यायचा. उन, पाऊस, थंडीमध्ये अनेकजण सिग्नलला थांबतात. परंतु, हा ताफा आला की सिग्नलही गपगार. अशावेळी सिग्नलला थांबलेल्या सामान्य नागरीकांच्या तोंडून काय उद्धार होत होता, हे जवळपास प्रत्येकानेच अनुभवले असेल. लाल दिवा म्हणजे अनेकांना धडकीच वाटत होती. (खरं तर वाटायचे काही कारण नव्हते) आपल्यामधूनच निवडून गेलेले अनेकजण पुढे लाला दिवा मिळाला की ओळखही विसरत होते. (आपल्या बहुमोल मताचा परिणाम दुसरे काय?) प्रचारादरम्यान आपल्या पाया पडणारे लाल दिवा मिळाल्यानंतर असे का वागतात, हे समजेनासे होत होते. परंतु, मोदींच्या निर्णयामुळे 1 मे पासून लाल दिवा इतिहासजमा होणार आणि आपण सर्वजण जणू एकच आहोत ही भावना वाटू लागणार.

लाल दिव्याबाबत...एक अनुभव...
काही महिन्यांपुर्वी एक लाल दिव्याची गाडी वेगाने आमच्या गाडीच्या पुढे भुर्रकन निघून गेली. अर्थात लाल दिवा असल्यामुळे वेगाचे नियंत्रण नसावे, अथवा आपल्याला कोणी अडवणार नाही, ही भावना त्यांच्यात असणार. परंतु, पुढे वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे काही पर्याय नसल्याने ही गाडी तिथे थांबलेली दिसली. एक कुतुहूल म्हणून त्या गाडीत डोकावले तर ज्या व्यक्तीसाठी लाल दिवा मिळाला होता, ती व्यक्ती त्या गाडीत नव्हतीच, अशा वेळी कोण काय आणि कोणाला बोलणार? लाल दिव्याचा वापर नातेवाईकांसाठीही केला जात असल्याचे बहुदा सर्वांनीच अनुभवले असेल. आता हे सर्व संपणार आहे.

प्रेस, पोलिसही घालवा...
पंतप्रधानांच्या निर्णयामुळे लाल दिवा तर गेला आहे. परंतु, विविध मोटारींवर Press, Police असेही लिहिलेले पहायला मिळते. परिवहन कायद्याच्या नियमानुसार हे लिहिण्यास परवानगी नाही. परंतु, अनेकांच्या वाहनावर हे लिहिलेले दिसते. लाल दिव्याप्रमाणेच हे सुद्धा घालविण्याची वेळ आली आहे. यामागचे कारण म्हणजे अनेकजण Press, Police च्या नावाखाली नियमांची पायमल्ली करताना दिसतात. आपण नियम पाळत असलो अथवा आपली स्वतःची ओळख असेल तर हे लिहीण्याची गरजच काय? विविध महामार्गांवर मोटारींवर Press लिहिलेली वाहने आढळतात. Press च्या नावाखाली या वाहनांमधून अवैध वाहतूक केली जात असल्याचे काही वर्षांपुर्वी अनुभवायला मिळाले. बहुदा असे चित्र आजही ठिकठिकाणी असावे. Press, Policeच्या नावाखाली अनेकजण गैरफायदा घेताना दिसतात. यामुळे लाल दिव्याप्रमाणेच ही नावे सुद्धा हद्दपार करावीत, असे अनेकांना वाटत आहे.

विविध अध्यक्ष...नेतेही...
रस्त्यावरून प्रवास करत असताना महागड्या मोटारींच्या पुढे अमुक-तुमकचा अध्यक्ष, नेते...अशी भली मोठी 'प्लेट' लावल्याचे पहायला मिळते. थोडक्यात, अशी वाहने आपल्या जवळ आली तर त्यांना आपण बाजुला होऊन रस्ता मोकळा करून द्यावा, असेच या मागील भावना असावी का? मोटारीत बसणारे जनतेचे नेते असतील तर मग एवढा सर्व खटाटोप कशासाठी? सर्वसामान्य नागरिक तुमच्या तोंडावर तुमच्यावर चांगले बोलतही असतील. परंतु, अशी मोटार जवळून गेल्यानंतर किती जण बोटे मोडत असतील याची जाणीव त्यांना व्हायलाच हवी.

लाल दिव्याची गाडी हे सरंजामी वृत्तीचे प्रतीक होते. अर्थात लाल दिवा काढून टाकल्याने सारे काही समान झाले, असे नाही. त्यासाठी आपण रयतेचेच प्रतिनिधी आहोत, ही भावना राज्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे ही खरी गरज आहे. ती होईल की नाही हे माहित नाही. परंतु, मोदींच्या निर्णयामुळे लाल दिवा तर गेल्यातच जमा आहे. परंतु, Press, Police व विविध पदांच्या मोठ-मोठ्या प्लेटही जायला हव्यात का? नको, का हव्यात? याबाबत तुम्हाला काय वाटते? अथवा तुम्हाला काही अनुभव आला असेल तर प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर लिहा.