साडेतीन लाख शाळांमध्ये सर्व शिक्षण मोहीम - जावडेकर

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - 'सर्व शिक्षण अभियाना'अंतर्गत देशभरातील 2.04 प्राथमिक व 1.59 लाख उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचे सार्वत्रीकरण झाले असल्याची माहिती, केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी दिली.

नवी दिल्ली - 'सर्व शिक्षण अभियाना'अंतर्गत देशभरातील 2.04 प्राथमिक व 1.59 लाख उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचे सार्वत्रीकरण झाले असल्याची माहिती, केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी दिली.

लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात बोलताना जावडेकर म्हणाले, 'शिक्षणाचे सार्वत्रिकरण हा सर्व शिक्षण अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. मुलींसह सर्व मुलांना शाळेत आणणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सभागृहात आजही नोटाबंदीवरून विरोधकांनी गोंधळ घातला. गोंगाटात बोलताना जावडेकर यांनी या अभियनाविषयी माहिती दिली. मुलींना शिक्षण घेणे शक्‍य व्हावे, यासाठी या अभियानांतर्गत विविध उपाय केले जात आहेत. गावाजवळ शाळा उभारणे, महिला शिक्षकांसह अतिरिक्त शिक्षकांची भरती करणे, मोफत पुस्तके, गणवेश, शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. माध्यान्ह भोजन योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारतर्फे आर्थिक सहकार्य केले जात आहे, असेही ते म्हणाले.

"स्वच्छ शाळा' उपक्रमांतर्गत ऑगस्ट 2014 ते 2015 या काळात दोन लाख 61 हजार 400 प्राथमिक व माध्यमिक सरकारी शाळांमध्ये मुलामुलींसाठी चार लाख 17 हजार 796 एवढी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. त्याचा लाभ 13.58 कोटी विद्यार्थ्यांना होत असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.