जयललितांबद्दल बोलताना शशिकलांना अश्रू अनावर

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

अम्मा आता आपल्यामध्ये नाहीत. तरीही आपल्या पक्षाला पुढील 100 वर्षे याठिकाणी सत्तेत रहायचे आहे.

चेन्नई - आज मी जी काही आहे, ती अम्मांमुळे आहे. अम्मांसाठी पक्षच सर्वकाही होते आणि अम्माच माझ्यासाठी सर्वकाही आहेत. अम्मांनी 75 दिवस संघर्ष केला, पण देवाने त्यांना बोलावून घेतले, असे म्हणत भावूक वातावरणात शशिकला नटराजन यांनी पदभार स्वीकारला.

तमिळनाडूमधील सत्तारूढ अण्णा द्रमुक पक्षाच्या दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या विश्‍वासू सहकारी शशिकला नटराजन (चिनम्मा) यांनी आज (शनिवार) पक्षाचा पदभार स्वीकारला. पक्षाच्या बैठकीत शशिकला यांना पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमण्याच्या ठरावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले होते. शशिकला यांची औपचारिकरीत्या सरचिटणीसपदी सर्वसहमतीने निवड करण्यात आली होती. पक्षाच्या सरचिटणीस आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. 

शशिकला म्हणाल्या, की अम्मा आता आपल्यामध्ये नाहीत. तरीही आपल्या पक्षाला पुढील 100 वर्षे याठिकाणी सत्तेत रहायचे आहे. मला पक्षाच्या सरचिटणीसपदी निवडल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.