बीसीसीआय प्रशासकांची नावे सुचवा:न्यायालय

पीटीआय
मंगळवार, 24 जानेवारी 2017

न्यायालयाने बीसीसीआयच्या प्रशासनासंदर्भात दिलेल्या निकालांमधील अटी व निकषांस अनुसरुनच या प्रशासकीय समितीमधील सदस्यांची नावे सुचविण्यात यावीत, अशी तंबीही यावेळी खंडपीठाने मंडळास दिली

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासनासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीमधील सदस्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकार व बीसीसीआयने बंद पाकिटाच्या माध्यमामधून करावी, असे निर्देश आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले.

येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी बीसीसीआयकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन सदस्यांची नावेही सुचविण्याची परवानगी न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मंडळास दिली. याचबरोबर, न्यायालयाने बीसीसीआयच्या प्रशासनासंदर्भात दिलेल्या निकालांमधील अटी व निकषांस अनुसरुनच या प्रशासकीय समितीमधील सदस्यांची नावे सुचविण्यात यावीत, अशी तंबीही यावेळी खंडपीठाने मंडळास दिली.

या प्रकरणाची सुनावणी आता येत्या 30 जानेवारी रोजी होणार असून प्रशासकीय समितीसाठीची नावे 27 जानेवारी पर्यंत देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.