"अयोध्या'प्रकरणी तातडीने सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

पीटीआय
शनिवार, 1 एप्रिल 2017

सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांना या खटल्यात तुम्हीही एक पक्षकार असल्याचे आम्ही मानतो, असे सांगितले

नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीदप्रकरणी दाखल दिवाणी याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. दोन्ही बाजूच्या पक्षकारांना आणखी वेळ देण्यासाठी न्यायालयाने हा निर्णय घेतला.

सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांना या खटल्यात तुम्हीही एक पक्षकार असल्याचे आम्ही मानतो, असे सांगितले. या प्रकरणात तुम्ही पक्षकार नाही, असे तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला प्रसिद्धी माध्यमांमधूनच केवळ हे समजले आहे, असे खंडपीठाने नमूद केले.

या मुद्यावर मी माझ्या पूजेच्या मूलभूत अधिकारांसह लढत असल्याचे मी स्पष्ट करू इच्छितो, असे स्वामी यांनी स्पष्ट केले. प्रलंबित प्रकरणामुळे माझ्या प्रार्थनेच्या अधिकारावर परिणाम होत आहे आणि मी मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे, असेही ते म्हणाले. त्यावर खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने होणार नसल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी 21 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर न्यायालयाच्या बाहेर तोडगा काढण्यास सुचविले होते. धार्मिक आणि भावनिक असा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडविला जावा, असे न्यायालयाने म्हटले होते.