तोंडी तलाकवर आता निकालाची प्रतीक्षा

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

मुस्लिमांमधील तोंडी तलाकची प्रथा त्यांच्या धर्माचा मूलभूत अधिकार आहे का, याची तपासणी केली जाईल, असे घटनापीठाने स्पष्ट केले असून, वेळ कमी असल्यामुळे बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या अन्य मुद्यांवर चर्चा केली जाणार नसल्याचेही नमूद केले आहे

नवी दिल्ली - मुस्लिमांमधील तोंडी तलाक प्रथेच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज राखून ठेवल्यामुळे आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान विविध पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. केंद्र सरकार, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, ऑल इंडिया मुस्लिम वुमन पर्सनल लॉ बोर्ड आणि याचिका दाखल केलेल्या अन्य विविध पक्षांनी यामध्ये आपले म्हणणे मांडले.

घटनापीठामध्ये कुरियन जोसेफ, आर. एफ. नरिमन, यू. यू. ललित आणि अब्दुल नझीर या न्यायाधीशांचाही समावेश असून, 11 मेपासून सुनावणीला सुरवात झाली होती. घटनापीठामध्ये समावेश असलेले न्यायाधीश शीख, ख्रिश्‍चन, पारशी, हिंदू आणि मुस्लिम या वेगवेगळ्या समुदायातील आहेत.

मुस्लिमांमधील तोंडी तलाकची प्रथा त्यांच्या धर्माचा मूलभूत अधिकार आहे का, याची तपासणी केली जाईल, असे घटनापीठाने स्पष्ट केले असून, वेळ कमी असल्यामुळे बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या अन्य मुद्यांवर चर्चा केली जाणार नसल्याचेही नमूद केले आहे. हे मुद्दे प्रलंबित ठेवले जातील आणि नजीकच्या काळात त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.

तोंडी तलाक एक पाप आहे : चढ्ढा
आज झालेल्या सुनावणीदरम्यान मुख्य याचिकाकर्त्या शायरा बानो यांचे वकील अमित सिंह चढ्ढा यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, की तोंडी तलाक धार्मिक विश्‍वासाचा मुद्दा असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे म्हणणे आहे. याची न्यायालयाने दखल घेऊ नये. त्याच वेळी केंद्र सरकारही तोंडी तलाकला विरोध करत आहे. मात्र कायदा बनविण्यास तयार नाही. माझ्या मते, तोंडी तलाक एक पाप आहे आणि हे पाप माझ्या व माझ्या ईश्‍वरामध्ये अडथळा आहे.

Web Title: SC reserves verdict on Triple Talaq