श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा संशय

वृत्तसंस्था
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

श्रीनगर येथील शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याच्या संशयावरुन शोध मोहीम हाती घेतली आहे.

श्रीनगर- येथील शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने आज(शनिवार) पासून शोध मोहीम हाती घेतली आहे. काही दहशतवाद्यांनी या जिल्ह्यांत घुसखोरी केल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात येत असल्याचे येथील स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. 

राष्ट्रीय रायफल्स्, राज्य पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि राष्ट्रीय राखीव पोलिस दल यांचा संयुक्त गट या दोन्ही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये प्रत्येक घराची झडती घेत आहे.

दक्षिण काश्मीर मधील काही जिल्ह्यांमध्ये यावर्षीच्या सुरुवातीपासूनच लष्कराने शोधकार्य आणि लष्कराचा सराव सुरु केला आहे. अतिरेक्यांना भरपूर लोकसंख्या असलेल्या वसाहतींमध्ये पाय ठेवणे शक्य होऊ नये या उद्देशाने अशा प्रकारच्या मोठ्या मोहीमा लष्कराकडून या क्षेत्रांत राबविल्या जात आहेत.