तमिळनाडूत दुसऱ्या दिवशीही 'रेल रोको' आंदोलन

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

राज्यातील विविध भागांत आंदोलकांनी "रेल रोको' केले. इग्मोर रेल्वे स्थानकात मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (एमडीएमके) या पक्षाचे सरचिटणीस वैको व विदुथलाई चिरुथंगल कच्छी पक्षाचे अध्यक्ष (व्हीकेसी) थोल तिरुमवलवन यांच्यासह डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एक्‍स्प्रेस गाड्या अडविल्या.

नेत्यांसह शेकडो शेतकऱ्यांना अटक
चेन्नई- कावेरी पाणीवाटपप्रश्‍न सोडविण्यासाठी कावेरी व्यवस्थापन मंडळ (सीएमबी) स्थापन करावे, या मागणीसाठी तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.17) "रेल रोको' आंदोलन केले. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही ते सुरू होते. विरोधी पक्षांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. तमिळ मनिला कॉंग्रेसचे नेते जी. के. वासन आणि 300 शेतकऱ्यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले.

राज्यातील विविध भागांत आंदोलकांनी "रेल रोको' केले. इग्मोर रेल्वे स्थानकात मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (एमडीएमके) या पक्षाचे सरचिटणीस वैको व विदुथलाई चिरुथंगल कच्छी पक्षाचे अध्यक्ष (व्हीकेसी) थोल तिरुमवलवन यांच्यासह डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एक्‍स्प्रेस गाड्या अडविल्या. वैको तिरुमवलवन या ज्येष्ठ नेत्याने रेल्वेगाडीच्या इंजिनवर चढून केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या. "नाम तामिझार कच्छी' या पक्षाचे नेते सीमन यांनी त्यांच्या समर्थकांसह सेंट्रल रेल्वे स्थानकावर आंदोलन केले. नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

कावेरी खोऱ्यातील तिरुचिरापल्ली आणि तंजावर जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. रेल्वे वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेकडो शेतकरी व राजकीय पक्षांच्या सदस्यांना पोलिसांनी अटक केली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मदुराईसह अन्य महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला होता. आंदोलकांना अडविण्यासाठी मदुराई स्थानकाबाहेर संरक्षक अडथळे उभारण्यात आले होते.