काश्‍मीरमध्ये बंदोबस्तात बारावीची परीक्षा सुरू

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016


काश्‍मीर परीक्षा जोड
----------
"काश्‍मिरी मुलांच्या भविष्याशी खेळू नका'
जम्मू- काश्‍मीरमध्ये बारावी बोर्डाची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. या पार्श्‍वभूमीवर बोलताना पंतप्रधान कार्यालयातील कामकाजमंत्री जितेंद्रसिंह म्हणाले, ""कोणत्याही प्रकारचे आंदोलन करून मुलांच्या करिअरमध्ये विघ्न आणण्याचा व त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोणत्याही कारणासाठी, मग ते धार्मिक असो वा अन्य कारणांसाठी निषेध करणाऱ्या कोणालाही मुलांचे भवितव्य अंधारात ढकलण्याचा हक्‍क नाही किंवा तसा विशेष अधिकारही दिलेला नाही. राज्यातील अस्वस्थ परिस्थितीत व विद्यार्थ्यांसह अनेकांचा विरोध असताना सरकारने परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ही परीक्षा म्हणजे पीडीपी- भाजप युतीच्या सरकारसाठी कसोटीची ठरणार आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीर राज्य मंडळातर्फे घेतली जाणारी बारावी बोर्डाची परीक्षा कडेकोट बंदोबस्तात सोमावारपासून सुरू झाली. राज्यातील अशांत परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर शाळा-महाविद्यालये बंद ठेवावी लागल्याने ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी होत होती. मात्र 50 टक्के अभ्याक्रमावर ही परीक्षा नोव्हेंबरमध्येच घेण्यावर सरकार ठाम होते.

दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासंबंधी राजकीय पक्षांची बैठक झाली होती. नोव्हेंबर किंवा मार्चमध्ये परीक्षा घ्यावी, अशी चर्चा त्याच वेळी झाली होती. त्यानंतर या परीक्षा यंदा दोन वेळा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. ज्यांना ही परीक्षा देणे शक्‍य होणार नाही, त्यांना पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा मार्चमध्ये देता येणार आहे.

शालेय शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण दहावी-बारावीतील एक लाख 26 हजार 593 विद्यार्थ्यांपैकी एक लाख पाच हजार 719 विद्यार्थ्यांनी (80 टक्के) नोव्हेंबरमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय स्वीकारला आहे. यापैकी बारावीचे 48 हजार विद्यार्थी आजपासून सुरू झालेल्या परीक्षेला बसले आहेत. दहावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. 15) सुरू होणार आहे. हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हाण वणी हा चकमकीत ठार झाल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात हिंसाचाराचे लोण उठले होते. त्यात शाळांनाही लक्ष्य करण्यात आले होते. यामुळे गेल्या चार महिन्यांपासून येथील वातावरण अनिश्‍चित बनले आहे. अशा वेळी परीक्षा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर लष्करी जवानांचा कडेकोड बंदोबस्त पुरविण्यात आला आहे.

दरम्यान, जम्मूत भारत-पाकिस्तान सीमेवरील सर्व शाळा मंगळवारपासून सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.

परीक्षा सोपी असेल - सरकार
परीक्षेची तयारी करणे हे खूपच कठीण आहे, मात्र 50 टक्के अभ्यास व्यवस्थित झाला असल्याने सर्व पेपर चांगले जातील, असा आत्मविश्‍वास वाटत आहे. पण मनावर थोडे दडपणही आहे, असे श्रीनगरमधील कोठीबाग भागातील शाळेत परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनीने सांगितले. अन्य एका विद्यार्थिनीची आई मसरत यांनी सांगितले, की त्यांच्या मुलीची शाळा गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे घरीच स्वतः अभ्यास करून ती परीक्षेला सामोरी जात आहे. ज्यांनी 50 टक्के अभ्यासाची तयारी चांगली केली असेल, त्यांना परीक्षेतील 100 टक्के प्रश्‍न सोडविता येतील, अशी ग्वाही सरकारने दिली आहे. त्यामुळे जर पेपर अवघड असतील, तर विद्यार्थ्यांनी तक्रार केली पाहिजे, असे मत मसरत यांनी व्यक्त केले.

Web Title: secondary school exams commences in Kashmir