पाकच्या विजयाने काश्‍मिरी फुटीरतावाद्यांना आनंद...

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

सगळीकडे फटाके फुटत आहेत. दोन्ही संघांपैकी चांगल्या संघाने आज विजय मिळविला. ईद काही दिवस आधीच आल्याचा भास येथे होत आहे. पाकिस्तानच्या संघाचे अभिनंदन

नवी दिल्ली - आयसीसी चॅंपियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केल्यामुळे काश्‍मीरमधील फुटीरतावादी पक्ष असलेल्या हुर्रियत कॉन्फरन्समधील महत्त्वपूर्ण नेते मीरवाईझ उमर फारुख यांना आनंद झाला आहे. पाकिस्तानच्या विजयामुळे येथे ईद काही दिवस आधीच अवतरल्याचे वाटत असल्याचे फारुख यांनी म्हटले आहे.

"सगळीकडे फटाके फुटत आहेत. दोन्ही संघांपैकी चांगल्या संघाने आज विजय मिळविला. ईद काही दिवस आधीच आल्याचा भास येथे होत आहे. पाकिस्तानच्या संघाचे अभिनंदन,'' अशा आशयाचे ट्विट फारुख यांनी केले होते. 44 वर्षीय मीरवाईज हे ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्स संघटनेमधील आवामी ऍक्‍शन कमिटीचे अध्यक्ष आहेत. याआधी, पाकिस्तानने इंग्लंडवर मिळविलेल्या विजयामुळे आनंदित झालेल्या फारुख यांनी पाकिस्तानला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.

दरम्यान, मीरवाईज यांच्या या ट्विटवर भारताचा प्रसिद्ध शैलीदार फलंदाज गौतम गंभीर याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ""मीरवाईज यांना माझा एक सल्ला आहे. आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी सीमारेषा ओलांडून जावे. त्यांना तेथे चांगले फटाके (चिनी?) व ईद साजरी करणारे मिळतील. मी त्यांना सामान बांधण्यासाठी मदत करु शकतो,'' असे गंभीर याने सुनावले आहे.

फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजीतील बेशिस्तपणाचा फटका भारताला बसला. या दोन्ही गोष्टींचा पुरेपूर फायदा उठवत रविवारी पाकिस्तानने चॅंपियन्स करंडकावर आपली मोहोर उमटवली. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांनी भारतावर एकतर्फी वर्चस्व राखत १८० धावांनी विजय मिळविला. या विजयाबरोबरच त्यांनी आयसीसी स्पर्धेतील भारताविरुद्धची पराभवाची मालिका खंडित केली.