आयोध्येचा वाद कोर्टाबाहेर सोडवा- सरन्यायाधीश

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

भाजपकडून स्वागत, विहिंप मोहीम उघडणार

भाजपचे प्रवक्ते संभित पात्रा यांनी याचे स्वागत करीत असल्याचे म्हटले आहे. विश्व हिंदू परिषदेने मात्र राम मंदीर उभारणीसाठी नव्याने मोहीम सुरू करणार असल्याचे जाहीर केले.

नवी दिल्ली : आयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वादावर न्यायालयाबाहेर मैत्रीपूर्ण तोडगा काढला पाहिजे. त्यामध्ये लोकांच्या भावनांचे मुद्दे आहेत. दोन्ही पक्ष चर्चेला एकत्र येणार असतील तर मी स्वेच्छेने मदत करायला तयार आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांनी हा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला. 

दरम्यान, न्यायमूर्ती खेहर यांचे हे मत म्हणजे आदेश नव्हे असे सूत्रांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.  
सरन्यायाधीश जे.एस. खेहर, न्या. डी.वाय. चंद्रचूड आणि न्या. संजय किशन कौल यांच्या खडपीठाने या सुनावणीवर बोलताना म्हटले की, न्यायालयीन आदेशापेक्षा मैत्रीपूर्ण तोडगा अधिक चांगला राहील.

आयोध्येचा मुद्दा संवेदनशील असून, अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 मध्ये दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी एका खंडपीठाची निर्मिती करावी, अशी मागणी स्वामी यांनी केली होती. आयोध्येतील जमिनीची विभागणी करावी, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 मध्ये दिलेल्या आदेशात म्हटले होते. 

दरम्यान, न्यायालयाबाहेर चर्चेने वाद मिटवावा या सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनेचे आणि न्या. खेहर यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावाचे भाजपने स्वागत केले आहे. भाजपचे प्रवक्ते संभित पात्रा यांनी याचे स्वागत करीत असल्याचे म्हटले आहे. विश्व हिंदू परिषदेने मात्र राम मंदीर उभारणीसाठी नव्याने मोहीम सुरू करणार असल्याचे जाहीर केले.