मानांकन संस्था वास्तवापासून दूर

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - जागतिक पातळीवरील पतमानांकन संस्था वास्तवापासून खूप दूर असून, त्या कुठे चुकत आहे, हे त्यांनीच शोधण्याची गरज आहे, अशी टीका आर्थिक कामकाज सचिव शक्तिकांत दास यांनी रविवारी केली.

नवी दिल्ली - जागतिक पातळीवरील पतमानांकन संस्था वास्तवापासून खूप दूर असून, त्या कुठे चुकत आहे, हे त्यांनीच शोधण्याची गरज आहे, अशी टीका आर्थिक कामकाज सचिव शक्तिकांत दास यांनी रविवारी केली.

दास म्हणाले, ""भारताचा विचार करता पतमानांकन संस्था वास्तवापासून खूप दूर असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात जागतिक बॅंक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या बैठकीच्या वेळी मी अनेक गुंतवणूकदारांशी चर्चा केली. भारताच्या पतमानांकनात सुधारणा न झाल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. मागील दशकात भारताचे पतमानांकन वाढविण्यात आले होते. "फिच'ने 2006 मध्ये आणि "एस ऍण्ड पी'ने भारताचे पतमानांकन "बीबीबी'वर नेले होते. मागील अडीच वर्षांत देशात घडलेल्या घटनांची माहिती या पतमानांकन संस्थांना नसावी. अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत भारताने केलेल्या सुधारणांची तुलना त्यांनी करायला हवी.''

"भारताचे देशांतर्गत एकूण उत्पादन (जीडीपी) आणि अन्य देशांचा जीडीपी यांची तुलना करा. भारताची चलनवाढ आणि चालू खात्यावरील तूट यांच्याशी अन्य देशांची तुलना करा. पतमानांकन संस्था नेमक्‍या कुठे चुकत आहेत, हे मला कळत नाही. याबाबत त्याच अधिक स्पष्टीकरण देऊ शकतील. वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी आणि दिवाळखोरी कायदा ही पावले पाहता, भारताचे पतमानांकन सुधारायला हवे,'' असे दास यांनी सांगितले.