शरद पवारांच्या सभेने सीमावासियांत चैतन्य 

sharad-pawar
sharad-pawar

बेळगाव : सीमालढ्याचे आधारस्तंभ व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या शनिवारी (ता. 31) बेळगावात झालेल्या जाहीर सभेने सीमावासियांत चैतन्य निर्माण झाले आहे. सभेत पवारसाहेब काहीतरी स्फोटक बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी त्याला मुरड घालत नेमके तेच बोलून उपस्थितांची मने जिंकली. सभा अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाल्याने आगामी विधानसभेतील यशाची ही नांदी ठरली. सभेमुळे सुरुवात तर दमदार झाली आहे. आता शेवटही गोड होईल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. 

सीमालढ्यात पहिल्यापासून सक्रिय योगदान देणारे शरद पवार तब्बल 32 वर्षांनी महाराष्ट्र एकिकरण समितीच्या व्यासपीठावर येणार होते. सीमालढ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्याबरोबरच न्यायालयीन लढाईतही सातत्याने सीमावासियांच्या पाठीशी राहण्याच्या वृत्तीमुळे सीमाभागात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. तसेच त्यांच्या शब्दालाही मान आहे. त्यामुळे, त्यांच्या सभेबद्दल सीमाभागासह कर्नाटक व महाराष्ट्रातही कमालीची उत्सुकता होती. ते सीमाप्रश्‍नावर काय बोलणार? त्यांचा आवेश कसा असेल? ते काही वादग्रस्त बोलतील का? याबद्दल सर्वजण अधीर होते. म्हणूनच त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सीमावासिय दुपारपासूनच सभास्थळी उपस्थित होते. 

श्री. पवार सायंकाळी साडेपाच वाजता बोलण्यास उभे राहिले. ते फक्‍त 21 मिनिटे बोलले. पण, जे काही बोलले ते डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले. शांत, संयमी, सखोल, मिश्‍किल अन्‌ अभ्यासपूर्ण भाषण कसे असते, याचा तो उत्तम परिपाठ होता. त्यांचे एकही वक्‍तव्य वादग्रस्त नव्हते. त्यांनी कुणावर टीका केली नाही की साधा आरोपही केला नाही. त्यात अवाजवी आवेश नव्हता की आक्रमकता. जे काही मांडले ते साध्या अन्‌ सरळ भाषेत. पण, आपल्या भाषणातून त्यांनी संबंधितांना योग्य तो संदेश दिला. 

भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी शालजोडीतून फटके लगावण्यास सुरुवात केली. मला सर्व भाषांबद्दल प्रेम आहे. मी कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही इतरांनीही करु नये, असे सांगत त्यांनी कर्नाटकला टोला लगावला. भाषावार प्रांतरचनेवरही त्यांनी मुलायम प्रहार केला. निवडणूक ही लोकेच्छा व्यक्‍त करण्याची संधी असल्याचे सांगत त्यांनी सीमाभागातून समितीचे अधिकाधिक आमदार निवडून आणण्याचा सल्लाही दिला. सीमाभागातील मराठी माणूस प्रामाणिक आहे, हे त्यांचे वाक्‍य खूप काही सांगून जाते. हा टोला अर्थातच समितीतील असंतुष्ट नेत्यांना होता. मतभेद गाडून एकत्र यावे असे सांगून समिती नेत्यांचे कानही पिरगाळले. पण, शेवटी त्यांनी सीमालढ्याचे मार्गदर्शक प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी एकत्र लढा असे सांगत नेतृत्त्व कुणाकडे राहील, याचे सुतोवाच केले. तसेच संपूर्ण भाषणात आपण आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार नाही याची दक्षताही घेतली. या भाषणावरुन शरद पवार ही काय चीज आहे याची प्रचीती आली. 

एकंदरीत पवारसाहेबांचे भाषण अंतर्मुख करणारे ठरले. त्याला सीमावासियांनी उत्स्फूर्त दादही दिली. वरकरणी पाहता त्यांचे भाषण वाक्‍यागणिक टाळ्या मिळवणारे नक्‍कीच नव्हते. तरीही भाषण संपल्यानंतर लोकांमधून "पवारसाहेबांनी सभा जिंकली' असाच सूर ऐकू आला. जे काही सांगायचे आहे, ते त्यांनी नेमकेपणाने मांडले. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने समितीची सुरुवात दमदार झाली, अशाच प्रतिक्रिया लोकांतून ऐकू येत होत्या. त्यांचे भाषण सीमावासियांसाठी बूस्टर डोस ठरावा एवढीच इच्छा. 

कन्नड पत्रकारांची निराशा 
भाषिकांबरोबरच कन्नडभाषिकांनाही शरद पवारांच्या सभेचे अप्रूप होते. विशेषता कन्नड पत्रकारांना ते काय बोलणार याची चिंता अधिक लागून राहिली होती. ते काहीतरी वादग्रस्त बोलतील अन्‌ आपल्याला कडक बातमी मिळेल, असाच त्यांचा व्होरा होता. त्यामुळे, सभेचे वार्तांकन करण्यासाठी कन्नड वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण, देशपातळीवरील राजकारणात अनेकांना लिलया धोबीपछाड करणाऱ्या शरद पवारांनी संयमी भाषण करुन त्यांचे मनसुबे उधळले. भाषणात काहीही वादग्रस्त नसल्याने त्यांची घोर निराशा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com