दिमाखदार सोहळ्यात शरद पवारांना 'पद्मविभूषण' प्रदान

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 मार्च 2017

राजकीय कारकिर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख

38 व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्रिपद याचा उल्लेख करून देशातील सर्वांत 'तरुण मुख्यमंत्री' होण्याचा मान त्यांना मिळाल्याचा विशेष उल्लेख, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद चार वेळेस भूषविण्याची त्यांना मिळालेली संधी, या कामगिरीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे

नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज राष्ट्रपतिभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात 'पद्मविभूषण पुरस्कार' राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पवार यांच्यासह अन्य 33 मान्यवरांना पद्म-पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ पार पडला. ज्येष्ठ भाजप नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी (पद्मविभूषण), मुंबईतील शल्यविशारद डॉ. टी. ई. उदवाडिया (पद्मभूषण), क्रिकेटपटू विराट कोहली (पद्मश्री), गायिका अनुराधा पौडवाल (पद्मश्री) यांचा त्यात समावेश होता.

सायंकाळी साडेसहा वाजता राष्ट्रपतिभवनातील दरबार हॉलमध्ये हा पुरस्कार-वितरण-सोहळा पार पडला. या समारंभास उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, गृहमंत्री राजनाथसिंह, संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार, ऊर्जामंत्री पीयूष गोयल, क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल, लघू-मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आदी उपस्थित होते.

पवार यांच्या संदर्भातील गौरवपत्रात त्यांच्या शेतकरी कुटुंबातील जन्माचा उल्लेख करतानाच अवघे चोवीस वर्षांचे वय असतानाच युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्षपद आणि 27 व्या वर्षी आमदार म्हणून निवड झाल्याचा उल्लेख आहे. 32 व्या वर्षी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद आणि 38 व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्रिपद याचा उल्लेख करून देशातील सर्वांत 'तरुण मुख्यमंत्री' होण्याचा मान त्यांना मिळाल्याचा विशेष उल्लेख, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद चार वेळेस भूषविण्याची त्यांना मिळालेली संधी, या कामगिरीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. 1991 मध्ये संरक्षणमंत्रिपद, 1995 मध्ये कॉंग्रेसचे संसदीय नेतेपद, 2004 मध्ये केंद्रीय कृषिमंत्रिपद याचाही उल्लेख या गौरवपत्रात करण्यात आला आहे.

'उत्कृष्ट संसदपटू' म्हणून मिळालेला पुरस्कार, सार्वजनिक क्षेत्रातील कामाची प्रदीर्घ मालिका, डेट्रॉईट विद्यापीठाने प्रदान केलेली सन्माननीय डॉक्‍टरेट, क्रिकेटच्या क्षेत्राबरोबरच कबड्डी, कुस्ती व अन्य क्रीडाक्षेत्रातील योगदानाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

आजच्या समारंभात कुमारी निवेदिता रघुनाथ भिडे (विवेकानंद केंद्र उपाध्यक्षा), डॉ. सुहासचंद्र विठ्ठल मापुस्कर (मरणोत्तर - पुण्याजवळच्या देहू येथे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कामगिरी), भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ चंद्रकांत पीठावा या महाराष्ट्राशी संबंधित मान्यवरांचा समावेश होता.

'राष्ट्रवादी'चे प्रमुख नेते उपस्थित
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तारिक अन्वर, प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी, विजयसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक, माजिद मेमन, वंदना चव्हाण हे खासदार, सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे हेही समारंभात हजर होते. पवार यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रतिभा पवार, 'सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार, कन्या खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, अजित पवार हे समारंभात उपस्थित होते.