खासदार गायकवाड विमानाने गेले की रेल्वेने?

टीम ई सकाळ
सोमवार, 10 एप्रिल 2017

जाईन तर बिझनेस क्लासनेच!
सदार गायकवाड मागील महिन्यात याच विमानाने प्रवास करीत असताना एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी त्यांचा वाद झाला होता. रागावरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी वादावादीत त्यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला 25 वेळा चप्पलने मारहाण केली होती. हे विमान पूर्णपणे इकॉनॉमी क्लासचे असूनही मला बिझनेस क्लासनेच जायचे आहे असा गायकवाड यांचा हट्ट होता. 

पुणे : शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी उड्डाण करणाऱ्या पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट काढले होते. त्याप्रमाणे ते आज (सोमवार) सकाळी पुण्याहून दिल्लीला विमानाने गेले असावेत अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विमानाऐवजी रेल्वेला पसंती देत गायकवाड हे मुंबईहून राजधानी एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले. 

'गायकवाड हे राजधानी एक्सप्रेसने दिल्लीला गेले असल्याचे नक्की आहे. ते आता दिल्लीत पोचले आहेत. मुंबई सेंट्रल की बोरिवली स्टेशनवरून ते रेल्वेत बसले हे खात्रीशीर सांगता येणार नाही. संसदेचे अधिवेशन संपेपर्यंत ते दिल्लीतच राहतील. नंतर कदाचित काही दिवस राहून ते राज्यात परततील,' असे गायकवाड यांचे निकटवर्तीय जितेंद्र शिंदे यांनी सांगिल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

गायकवाड यांनी या घटनेबाबत लोकसभेत निवेदन केल्यानंतर, तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री दिलगिरी व्यक्त केल्यावर त्यांच्या विमान प्रवासावरील बंदी दोन दिवसांपूर्वी उठविण्यात आली. 
एअर इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी AI 852 या विमानातील बिझनेस क्लासचे तिकीट काढले असून, ते विमान आज (सोमवार) सकाळी 7.40 वाजता पुण्यातील लोहगाव विमानतळावरून दिल्लीकडे जाण्यासाठी उड्डाण केले. नियोजित वेळेनुसार हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 9.50 वाजता पोचणे अपेक्षित होते. गायकवाड हे आज लोकसभेत हजेरी लावण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. 

हेच ते विमान!
याच विमानाने खासदार गायकवाड मागील महिन्यात प्रवास करीत असताना एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी त्यांचा वाद झाला होता. रागावरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी वादावादीत त्यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला 25 वेळा चप्पलने मारहाण केली होती. हे विमान पूर्णपणे इकॉनॉमी क्लासचे असूनही मला बिझनेस क्लासनेच जायचे आहे असा गायकवाड यांचा हट्ट होता. 

'उन्हाळी वेळापत्रक 26 मार्चपासून लागू करण्यात आले असून, नव्याने दाखल करण्यात आलेली A320 विमाने आम्ही पुणे ते दिल्ली दरम्यान चालवत आहोत. या विमानाला बिझनेस क्लास आहे,' असे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.