शिव्या ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही- गायकवाड

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

शिव्या ऐकून घ्यायच्या का? त्यामुळे मारहाण केली. मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही शिव्या ऐकून घ्यायला.

नवी दिल्ली - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर 'एएनआय'शी बोलताना शिव्या ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा आहे, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानात बसण्याच्या जागेवरुन वाद झाला. त्यानंतर एअर इंडियाचा कर्मचारी आणि गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले.

रवींद्र गायकवाड हे आज (गुरुवार) पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचे बिझनेस क्लासचे तिकीट होते, मात्र त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसण्यास सांगितले. यावरुन त्यांची क्रू मेंबर सोबत वादावादी झाली. यानंतर गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली.

दरम्यान, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने आपल्यासोबत गैरवर्तन केले, त्यामुळे त्याला मारले, असे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले आहे. शिव्या ऐकून घ्यायच्या का? त्यामुळे मारहाण केली. मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही शिव्या ऐकून घ्यायला. रवींद्र गायकवाड हे उस्मानाबादचे खासदार आहेत.