मोदीजी, गायकवाड प्रकरण गांभीर्याने घ्या : जेडीयू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

"एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पाठिशी उभी राहिलेली शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) भोजनाच्या कार्यक्रमावरच बहिष्कार घालण्याचा इशारा देत असून त्यासाठी मंत्र्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, अशी सूचनाही जेडीयूने दिली आहे.

पाटना (बिहार) - "एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पाठिशी उभी राहिलेली शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) भोजनाच्या कार्यक्रमावरच बहिष्कार घालण्याचा इशारा देत असून त्यासाठी मंत्र्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, अशी सूचनाही जेडीयूने दिली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना जेडीयूचे नेते अजय आलोक म्हणाले, "शिवसेना मंत्र्यांना ब्लॅकमेल करून या विषय उचलून धरत आहे. आमच्या पंतप्रधानांनी या प्रकरणी लक्ष द्यावे आणि हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे. या प्रकरणाविरुद्ध त्यांनी काही कारवाई असे मला वाटते. शिवसेनेने उचललेले पाऊल अस्वस्थ करणारे आहे. सत्तेत आहेत म्हणजे त्यांना वाट्टेल ते करण्याचा अधिकार नाही. हा सारा प्रकार तरुण पाहत आहेत आणि त्यांना चुकीचा संदेश जात आहे. जर शिवसेनेला असे वाटत असेल की ते जे काही करत आहेत त्यामागे सर्व देश उभा आहे, तर ते चुकीचे आहे.' जेडीयूचे नेते के. सी. त्यागी यांनीही गायकवाड प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "हा सगळा प्रकार मागील दोन आठवड्यांपासून सुरू आहे. मला आश्‍चर्य वाटते की एनडीएने या प्रकरणावर अद्यापही मौन धारण केले आहे. शिवसेना कायदा हातात घेत असताना आपण त्यांना थांबवायला हवे आणि त्यांना जाणीव करून द्यायला हवे की नागरिक हे त्यांच्यापेक्षा वर आहेत.'

दरम्यान "जर हे प्रकरण 10 एप्रिलपर्यंत मिटले तरच आम्ही एनडीएच्या भोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू', असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.