काँग्रेसकडेही एक अमित शहा आहे..! नाव आहे...

D Sivakumar
D Sivakumar

बंगळूर : गेल्या अनेक निवडणुकांपासून अमित शहा यांची रणनीती आणि अचूक नियोजन याच्या जोरावर भाजपने यश मिळविले. तेव्हापासून अमित शहा यांच्यातील रणनितीकाराचे कौतुक होत आले. काँग्रेसकडे अशा आक्रमक रणनितीकारांची वानवा असल्याने गेल्या दोन वर्षांत निवडणुकीत मिळालेले माफक यशही राजकीय ढिलाईमुळे गमवावे लागले होते. कर्नाटकमध्ये मात्र तसे झाले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डी. शिवकुमार! 

कर्नाटकमध्ये निवडणूक निकाल लागल्यानंतर ही विधानसभा त्रिशंकू होणार, हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर संख्याबळ कमी असतानाही भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केल्यामुळे घोडेबाजारास जोर येणार, हेही नक्की होते. एरवी भाजपची प्रचारयंत्रणा प्रचंड वेगाने काम करते. इतक्‍या वेगाची सवय नसल्यामुळे काँग्रेसला नजीकच्या भूतकाळात सातत्याने पराभवाची चव चाखावी लागली होती. यंदा मात्र कर्नाटकमध्ये हे चित्र पालटण्यात काँग्रेसला यश आले. या सगळ्याचे सूत्रधार होते डी. शिवकुमार! 

मोक्‍याच्या क्षणी काँग्रेससाठी धावून जाण्याची ही शिवकुमार यांची पहिलीच वेळ नाही. 'मास्टर स्ट्रॅटेजिस्ट' अशी शिवकुमार यांची ओळख आहे. 2002 मध्ये महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्यावर विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची वेळ आली होती. त्यावेळी शिवकुमार यांनी पुढाकार घेत काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईहून बंगळूरला हलविले होते. यामुळे काँग्रेसचे आमदार एकत्र ठेवण्यात पक्षाला यश आले होते. त्यावेळी शिवकुमार हे तत्कालीन कर्नाटक सरकारमध्ये मंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे ते विश्‍वासू मंत्री होते. 

गेल्याच वर्षी गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे आमदार फुटण्याची दाट शक्‍यता होती. सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अहमद पटेल यांच्या पराभवाची चिन्हे दिसू लागल्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यावेळीही काँग्रेसच्या आमदारांना 'सुरक्षित' ठेवण्याची जबाबदारी शिवकुमार याच्याकडेच होती. गेल्या सिद्धरामय्या सरकारमध्ये उर्जामंत्री असलेल्या शिवकुमार यांनी गुजरात काँग्रेसच्या सर्व आमदारांना एका गोल्फ रिसॉर्टमध्ये एकत्र ठेवले होते. 

आज कर्नाटकमध्ये काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती वाटत होती. पण शिवकुमार यांनी सर्वांना बंगळूरबाहेर हलवून आज सकाळी थेट विधानसभेत आणण्याची चोख व्यवस्था केली. इतकेच नव्हे, तर काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला आणण्यासाठी शिवकुमार स्वत: गाडीपर्यंत जात होते आणि त्या आमदाराला विधानसभेत आतपर्यंत सोडत होते. या सर्व आमदारांची 'कस्टडी' शिवकुमार यांच्याकडेच होती. लिंगायत समाजाचे आमदार 'जेडीएस'ऐवजी भाजपला मतदान करतील, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना होती. पण एकही आमदार फुटू न देता शिवकुमार यांनी पुन्हा एकदा 'मास्टर स्ट्रॅटेजिस्ट' म्हणून स्वत:ला सिद्ध केले.. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com