मुख्यमंत्री म्हणाले... माफ करा, मला मराठी येत नाही...!

मुख्यमंत्री म्हणाले... माफ करा, मला मराठी येत नाही...!

बेळगाव : इये मराठीची नगरी असे चिक्कोडी तालुक्‍यातील अनेक गावांचे चित्र... मग तेथे गेल्यानंतर मराठी बोललंच पाहिजे. मग ते राज्याचे मुख्यमंत्री का असेनात. पण, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना कुठे मराठी येते.... मग त्यांनी चक्क 'मला मराठी येत नाही, माफ करा...! असे म्हणत मराठी भाषिकांची माफी मागितली.

सर्वत्र कानडी वरंवटा फिरवत राजकारण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना येथे मराठी येत नसल्याची खंत व्यक्त करावी लागली, हा मराठी भाषेचा विजय म्हणावा लागेल.

मुख्यमंत्रीसाहेब ही आहे मराठीची ताकद पण, तुम्ही समजून कधी घेणार? असा प्रश्‍न सीमावासियांतून विचारला जात आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. चिक्‍कोडीचे कॉंग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केरी व निपाणीचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या येथे गेले होते. प्रचारसभेला दोन तास उशीराने पोचल्याने आधी त्यांनी मतदारांची माफी मागितली. चिक्‍कोडी आणि निपाणी मतदार संघात मराठी भाषिकांची संख्या अधिक असल्याने प्रचाराच्या स्टेजवरही मराठीमध्ये बॅनर झळकत होते. हे मुख्यमंत्र्यांना निश्‍चितच जाणवले. त्यांना मराठी येत नाही आणि स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना कन्नडशिवाय पर्याय राहिला नाही.

परंतु, भाषणाला सुरवात करण्यापूर्वी त्यांनी माफ करा मला मराठी येत नाही, अशी कबुली देऊन मराठी जनतेची माफी मागितली व भाषण कन्नडमध्ये सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी असे माफी मागणे पाहून याठिकाणी उपस्थित अनेकांच्या भुवयाही उंचावल्या.

बेळगाव सीमाप्रश्‍नाबाबत नेहमीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून वादग्रस्त विधाने करण्यात आली आहेत. बेळगाव हा कर्नाटकाचाच भाग असल्याचे सांगून त्यांच्यासह कर्नाटकातील मंत्र्यांनी मराठी हवे, तर महाराष्ट्रात जा, असा अनाहुत सल्लाही दिला आहे. आपले कानडी प्रेम मिरविणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनीही अनेकवेळा मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. लाल-पिवळ्याला मान्यता देणे, बेळगावचे बेळगावी करणे इतकेच नव्हे तर सर्व सीबीएसई अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांमध्येही कन्नड सक्तीचे आदेश दिले आहेत, हे सर्व सिद्धरामय्यांनीच केलेले आहे.

परंतु, ज्यांची मातृभाषा मराठी आहे, त्यांनाही महत्व आहे, हे मात्र ते विसरले होते. परंतु, आज मराठीबहुल भागात गेल्यानंतर त्यांना मराठीची माफी मागावी लागली, हे काही कमी नाही. मात्र आता निवडणुकीत मात्र इतर भाषांबाबतही समानुभूतीची भूमिका बजावली जात असून आजच्या चिकोडीतील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी मराठी येत नसल्याचे सांगत केलेली क्षमा याचना केवळ निवडणुक गिमिक ठरली आहे.

''बेळगावचा बराचसा भाग मराठी आहे, हे आता मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले असेल. तेव्हा त्यांनी आता तरी कानडी वरवंटा फिरविण्याचा अट्टाहास सोडावा. जर आपल्याला मराठी भाषा येत नसेल, तर भाषांतरकार वापरून तेथील जनतेला समजेल अशा भाषेत सांगण्याची गरज आहे''
- मधु कणबर्गी, ज्येष्ठ सीमातपस्वी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com