सोन्याची पुन्हा समुद्रमार्गे तस्करी सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

दुर्बइतून आलेले 44 किलो सोने जप्त; गुजरातमधील मुंद्रा बंदरातून देशात दाखल

कारवाई केल्यानंतर 44 किलो सोनं जप्त करण्यात आले. पोल्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या इनक्युबेटर या उपकरणात हे सोनं लपवण्यात आलं होतं.

नवी दिल्ली : दुबईतून समुद्रमार्गे तस्करी करण्यात आलेले 44 किलो सोने महसुली गुप्तचर संचालनालयाने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत साडेबारा कोटी रुपये असून, समुद्रमार्गे तस्करीचा मार्ग तस्कर पुन्हा अवलंबू लागले आहेत.

गुजरातमधील मुंद्रा बंदरातून आलेल्या मालमोटारीची तपासणी काल (शनिवारी) दिल्लीतील चंदरविहार परिसरात करण्यात आली. या मालमोटारीतून अंडी उबवण्याच्या यंत्रांच्या धातूच्या बॉक्‍समध्ये लपविलेल्या 44 किलोच्या सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या. या विटा बंदरावर तपासणीत सापडू नयेत, या पद्धतीने धातूच्या बॉक्‍समध्ये लपविण्यात आल्या होत्या. एक उंडी उबवणी यंत्र आयात करून त्यासोबत अन्य यंत्राच्या बॉक्‍समध्ये सोन्याची तस्करी करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्राथमिक चौकशीनुसार, या टोळीने तीनशे किलो सोन्याची दुबईतून भारतात समुद्रमार्गे तस्करी केली आहे. या प्रकरणी आयातदाराच्या कारखान्यावर छापा टाकून दुबईतून होणारी तस्करी आणि हवाला व्यवहारांचे अनेक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

सत्तर-ऐंशीच्या दशकातील कार्यपद्धती
सत्तर आणि ऐशींच्या दशकात दुबईतून समुद्रमार्गे सोन्याची तस्करी जोरात सुरू होती. अरबी छोट्या नौका आणि मालवाहतूक करणाऱ्या जहाजातून ही तस्करी होत होती. तपास यंत्रणांकडून त्या वेळी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाल्याने ही तस्करी बंद झाली होती.