मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचे सोशल मीडियावर उठले रान

वृत्तसंस्था
रविवार, 11 जून 2017

मध्य प्रदेशातील मंदसौर येथील शेतकऱ्यांवरील गोळीबाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती तरुणांकडून सोशल मीडियावर दिली जात आहे.

मंदसौर - मध्य प्रदेशातील मंदसौर येथील शेतकऱ्यांवरील गोळीबाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती तरुणांकडून सोशल मीडियावर दिली जात आहे. एकूणच मध्य प्रदेशामध्ये नेतृत्वविना सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने सोशल मीडियावर रान उठविले आहे.

मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाला नेतृत्व मिळाले नसले, तरी आंदोलनाचा मात्र राज्यभर विस्तार झाला. विशेषत: मंदसौर आणि त्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. या भागामध्ये प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली आहे. यामागे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाचे उठविलेले रान होय. सोशल मीडियाद्वारे शेतकरी आंदोलनाचे व्हिडिओ, मेसेजेस आदींच्या माध्यमातून आंदोलनाचे लोण वाढविण्यात येत आहे. मंदसौर येथील आंदोलनामध्ये ऐंशी टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आंदोलक 16 ते 30 वयोगटातील असून, या तरुणांमुळेच शेतकरी आंदोलन अधिक व्यापक झाले आहे. तरुण आंदोलकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाचे स्वरूप व भूमिका लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. यामुळे राज्यभरातून या आंदोलनाला बुद्धिजिवींचा पाठिंबा मिळाला. याचसोबत सर्वसामान्यांनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन तरुणांचे मनोधैर्य वाढविले. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्‌सऍप आदी माध्यमातून वेगवेगळ्या ट्रेंड्‌सद्वारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला.

सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून प्रशासनाला मात्र धडकी भरली. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी आंदोलन आणखी चिघळू नये, याकरिता मंदसौर व लगतच्या जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात पहिल्यांदा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याची भूमिका यशस्वी झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचण्याचा एक प्लॅटफॉर्म मिळाला.
- केदार सिरोही, नेते, आम किसान युनियन