यमुना पूर्ववत होण्यास 10 वर्षे अन् 42 कोटी; श्रीश्री यांच्यावर खापर

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

तज्ज्ञांचा दावा 

  • महोत्सवामुळे नदीचे पूरक्षेत्र पूर्ण उद्‌ध्वस्त 
  • पूरक्षेत्र सपाट केल्याने जलपरिसंस्थेचे नुकसान 
  • स्टेजच्या उभारणीसाठी नदीपात्रात मोठा भराव 
  • भरावामुळे नदीतील गवत, वनस्पती नष्ट 
  • जलचरांचे खाद्य नष्ट झाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्‍यात 
  • "डीएनडी फ्लायओव्हर' ते बारापुल्लादरम्यानचा भाग नष्ट 

नवी दिल्ली : आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी नदीपात्रात घेतलेल्या सांस्कृतिक महोत्सवामुळे यमुनेचे मोठे नुकसान झाले असून, ते भरून येण्यासाठी दहा वर्षांचा अवधी लागणार आहे.

भौतिक आणि जैविक अशा दोन पातळ्यांवर आपल्याला नदीचे पुनर्वसन करावे लागेल, यासाठी 42.02 कोटी रुपयांचा निधी आवश्‍यक असल्याचा अहवाल तज्ज्ञांच्या समितीने राष्ट्रीय हरित लवादास सादर केला आहे. नदीचे पात्र पूर्ववत करण्यासाठी निश्‍चित नियोजन आराखडा तयार करावा लागेल. भौतिक घटकांची हानी ही दोन वर्षांत भरून काढावी लागेल. नदीच्या जैविक परिसंस्थेचे नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला दहा वर्षांचा वेळ लागेल, असेही या समितीच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ने मात्र समितीचा अहवाल पूर्वग्रह दूषित असल्याचा आरोप केला आहे. आम्ही कधीही पर्यावरणाचे नुकसान केले नाही. आमची समिती परिस्थितीची पाहणी करून पुढे नेमकी काय कृती करायची याचा निर्णय घेईल, असे सांगण्यात आले. जलस्रोत मंत्रालयाचे सचिव शशी शेखर यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या समितीने हा अहवाल तयार केला आहे. नदीच्या उजवीकडील किनाऱ्यावरील 120 हेक्‍टर, तर डावीकडील किनाऱ्याचा भाग असलेल्या 50 हेक्‍टरच्या पूरक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या जैव व्यवस्थेलाही याचा मोठा फटका बसल्याचे समितीने म्हटले आहे. मागील वर्षी रविशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन'च्या वतीने यमुना नदी पात्रामध्ये जागतिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

सुरवातीपासूनच अनेक कारणांमुळे हा महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या महोत्सवानंतर यमुना नदीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन हरित लवादाने रविशंकर यांना पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. रविशंकर यांनी या दंडावरून लवादावरच टीका केली होती. दरम्यान, याचवेळी तज्ज्ञांच्या समितीने रविशंकर यांच्याकडून 100 ते 120 कोटी रुपये एवढी नुकसानभरपाई घेतली जावी, अशी सूचना हरित लवादास केली होती.