भारतातील मॉन्सून पूर्वपदावर येतोय;तापमानातील बदल कारणीभूत

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

2002 पासून मॉन्सूनचा पाऊस चांगला पडत असून उत्तर आणि मध्य भारतातमध्ये नद्यांना मोठे पूर येत आहेत. यामुळे भारतामधील कोरडे वातावरण कमी होत आहे. भारतातील जमीन आणि समुद्रावरील वातावरणात झालेला बदल या वातावरणातील बदलास कारणीभूत असण्याची शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे

बोस्टन - भारतातील मॉन्सून गेल्या 15 वर्षांमध्ये अधिक प्रभावशाली झाला असून त्यामुळे भारतात पन्नास वर्षांपासून असलेले सर्वसाधारण दुष्काळी वातावरण निवळून पूर्वीप्रमाणे पर्जन्यमान सुरू होणार आहे. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधील (एमआयटी) संशोधकांनी याबाबत तयार केलेल्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारतामध्ये दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मॉन्सूनचा पाऊस बरसतो. गेल्या काही दशकांमध्ये मात्र उत्तर आणि मध्य भारतात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, 2002 पासून मॉन्सूनचा पाऊस चांगला पडत असून उत्तर आणि मध्य भारतातमध्ये नद्यांना मोठे पूर येत आहेत. यामुळे भारतामधील कोरडे वातावरण कमी होत आहे. भारतातील जमीन आणि समुद्रावरील वातावरणात झालेला बदल या वातावरणातील बदलास कारणीभूत असण्याची शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांचे हे संशोधन नेचर क्‍लायमेट चेंज या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

संशोधनकांनी 1900 पासून प्रत्येक वर्षी पडलेल्या पावसाच्या प्रमाणाचा अभ्यास केला. यानुसार, 1950 च्या दशकापासून उत्तर आणि मध्य भारतात मॉन्सूनचा पाऊस कमी पडत आहे. याच काळात आफ्रिका आणि पूर्व आशियामध्येही मॉन्सून अधिकाधिक कोरडा जाऊ लागला. मात्र, या दोन्ही ठिकाणी 1980 पासून स्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली होती. भारतात मात्र 2002 पासून मॉन्सून पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे.

तापमानातील बदल कारणीभूत
या अहवालानुसार, 2002 पासून संपूर्ण भारतीय उपखंडामधील तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्याबरोबरच हिंदी महासागरावरील तापमानात घट झाली आहे. जमीनीवरील तप्त हवा आणि त्यातुलनेत समुद्रावरील थंड हवा ही जोरदार मॉन्सूनसाठी अतिशय योग्य पार्श्‍वभूमी आहे. हवामानशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहता, भारतामध्ये अचानक तापमान वाढले आणि हिंदी महासागरावरील तापमान अचानक कमी झाले. हा बदल नक्की कशामुळे झाला, त्याचा अभ्यास सुरु आहे. भारताती मॉन्सून ही हवामानशास्त्राने नोंद केलेली सर्वाधिक दीर्घकाळ सुरू असलेली मॉन्सून यंत्रणा असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले.