परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या तणावात मोठी वाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी आपले वेळापत्रक तयार करावे व त्यानुसार अभ्यास करावा. त्यामध्ये ऐनवेळी कोणताही बदल करू नये किंवा यापूर्वी कामी आलेल्या एखाद्या पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून तणाव निर्माण होणार नाही.
- सुष्मा हेब्बर, मानसोपचारतज्ज्ञ

नवी दिल्ली: नुकतीच 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांना सुरवात झाली असून, या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या तणावात लक्षणीय वाढ झाल्याचे एका पाहणीत पुढे आहे.
नॅशनल जर्नल ऑफ इंटिग्रेटेड रिसर्च इन मेडिसीनने ही पाहणी केली आहे. परीक्षांना सुरवात होण्याच्या एक महिनाअगोदर 13 टक्के विद्यार्थ्यांमध्ये तणाव आढळून आला होता; मात्र परीक्षा तोंडावर म्हणजे अगदी एका आठवड्यावर आल्यानंतर हे प्रमाण 82.2 टक्‍क्‍यांवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर येणारा तणाव धोकादायक असून, त्याचा विद्यार्थ्यांवर शारीरिक व मानसिक असा परिणाम दिसून येतो. परीक्षेमुळे त्यांच्या मनावर येणाऱ्या दडपणाबरोबर त्यांच्या हृदयाच्या ठोकांमध्येही बदल होतो. ही बाब घातक असून, त्यांचे जेवणाकडे, दैनंदिन कामाकडे, तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते. असे अहवालात नमूद आहे. अशा प्रकारचा तणाव निर्माण होण्यामागे पालकांचा दबाब, इतरांच्या तुलनेत कमी गुण अशी अन्य कारणे देण्यात आली आहेत.

तणाव टाळण्यासाठी हे करा...
- अभ्यासादरम्यान ब्रेक घ्या
- शरीरातील पाण्याचे संतुलन राखा
- वेळेवर आहार घ्या
- कमीत कमी 6 तासांची झोप आवश्‍यक

Web Title: student examination and tension