काश्‍मीर खोऱ्यात विद्यार्थी रस्त्यावर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

पुलवामा येथील डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या कथित क्रूर कारवाईच्या निषेधार्थ आज काश्‍मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनांना हिंसक वळण मिळाल्याने सुरक्षा दलाला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, तसेच लाठीमारही करावा लागला.

श्रीनगर : पुलवामा येथील डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या कथित क्रूर कारवाईच्या निषेधार्थ आज काश्‍मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनांना हिंसक वळण मिळाल्याने सुरक्षा दलाला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, तसेच लाठीमारही करावा लागला. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील वर्गावर देखील बहिष्कार घातला. दरम्यान, काश्‍मीर खोऱ्यातील चिघळणारी परिस्थिती पाहता थ्रीजी आणि फोरजी सेवा बंद करण्याचे निर्देश जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. 

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की श्रीनगरमध्ये आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पुलवामा घटनेच्या निषेधार्थ रॅली काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो मोर्चा अडवला. या वेळी झालेल्या हिंसाचारात सुरक्षा दलाला बळाचा वापर करावा लागला. आंदोलनकर्त्यांत बहुतांश विद्यार्थी डिग्री कॉलेजचे विद्यार्थी होते, तर काही विद्यापीठाचे होते. शहरातील गजबजलेल्या लालचौकसहित अनेक ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे जनजीवन विस्कळित झाले. पुलवामातील डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांविरुद्ध सुरक्षा दलाने कथित क्रूर कारवाई केल्याने त्याविरोधात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. मौलाना आझाद रोडवर लाल चौकजवळ श्री प्रताप (एसपी) कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. मोर्चा अडवताच हिंसाचार उसळला. सुरक्षा दलावर दगडफेक करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, तसेच लाठीमारही करावा लागला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि दुकाने पटापट बंद झाली. त्यानंतर महिला कॉलेजसह अन्य कॉलेजमध्येही निदर्शने करण्यात आली. गंदरबल, बारामुल्ला, शोपियॉं, पुलवामा जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी कॉलेजमध्ये आंदोलन सुरू होते. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले असून, त्याचा निश्‍चित आकडा मात्र समजू शकला नाही. माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.