शिवसेना सदस्यांना सुमित्रा महाजनांचे खडे बोल

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

गायकवाड यांना विमानबंदीचा मुद्द्यावर लोकसभेत गोंधळ

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणारे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासावर विमान कंपन्यांनी घातलेली बंदी रद्द व्हावी, यासाठी शिवसेनेने लोकसभेत आक्रमकपणे मागणी केली. मात्र, त्यासाठी गोंधळ घालणाऱ्या शिवसेना खासदारांना "यातून चुकीचा संदेश जातो आहे,' असे लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे खडे बोल ऐकावे लागले. एवढेच नव्हे, तर सरकारनेही झालेली कारवाई "सुरक्षेच्या नियमानुसार' असल्याचे सांगत प्रवासबंदीवर काहाही आश्‍वासन दिले नाही.

गायकवाड यांना विमानबंदीचा मुद्द्यावर लोकसभेत गोंधळ

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणारे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासावर विमान कंपन्यांनी घातलेली बंदी रद्द व्हावी, यासाठी शिवसेनेने लोकसभेत आक्रमकपणे मागणी केली. मात्र, त्यासाठी गोंधळ घालणाऱ्या शिवसेना खासदारांना "यातून चुकीचा संदेश जातो आहे,' असे लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे खडे बोल ऐकावे लागले. एवढेच नव्हे, तर सरकारनेही झालेली कारवाई "सुरक्षेच्या नियमानुसार' असल्याचे सांगत प्रवासबंदीवर काहाही आश्‍वासन दिले नाही.

लोकसभेत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी शून्यकाळात हा मुद्दा उपस्थित केला. खासदार गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यावर आक्षेप नाही; परंतु, या निमित्ताने सर्व विमान कंपन्यांनी त्यांच्यावर बंदी लादल्यामुळे प्रवास करण्याच्या घटनादत्त अधिकारांचे उल्लंघन होत असून मतदारसंघातील प्रश्‍न मांडण्याच्या हक्कांवरही यामुळे गदा येत आहे. दूरचित्रवाणी कलाकार कपिल शर्मा यानेही विमानात मारहाण केल्याची घटना घडली. त्या प्रकरणाची केवळ चौकशी झाली, पण खासदारांना मात्र वेगळा न्याय लावत त्यांच्यावर प्रवासबंदी लादण्यात आली. यात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी अडसूळ यांनी व्यक्त केली.
या प्रकारावर सरकारची भूमिका मांडताना मुलकी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी, खासदार गायकवाड यांच्यावरील कारवाई ही प्रवाशाच्या सुरक्षेसाठी नोव्हेंबर 2014 मध्ये अस्तित्वात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच असल्याचे स्पष्ट केले. प्रवाशाच्या वर्तनानुसार त्याला प्रवास करू द्यायचा किंवा नाही याचा अधिकार विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) यांना आहे.

खासदारांकडून असे गैरवर्तन घडेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. नियम सर्वांसाठी सारखे आहेत, असेही राजू यांनी बजावले. यात सरकारकडून ठोस आश्‍वासन न मिळाल्यामुळे शिवसेना खासदारांनी लोकसभाध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत धाव घेऊन दाद मागण्याचा प्रयत्न केला. परंतु, या वर्तनामुळे लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन संतप्त झाल्या. "चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू नका, या गोंधळातून वाईट संदेश जातो आहे', अशा शब्दांत त्यांनी खडसावले. ही संपूर्ण घटना लोकप्रतिनिधींची प्रतिमा खराब करणारी असल्यामुळेच त्यावर बोलण्याची परवानगी दिली. यावर विमान वाहतूक मंत्र्यांशी बोलून मार्ग काढा. आपल्याला अधिक बोलण्यास भाग पाडू नका, असा कठोर इशारा दिल्यानंतर शिवसेना खासदार शांत झाले. दरम्यान, याच मुद्द्यावर शिवसेना खासदार, मंत्री अशोक गजपती राजू यांची लोकसभाध्यक्षांच्या दालनात स्वतंत्र बैठकही झाली. मात्र त्यातून ठोस निष्पन्न झाले नसल्याचे समजते. लवकरच सर्वमान्य तोडगा निघेल असा आशावाद शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला.

शिवसेनेला ओवेसींचा पाठिंबा
शिवसेनेसाठी गायकवाड प्रकरण प्रतिष्ठेचे बनले असले तरी लोकसभेत मात्र हा विषय उपस्थित करतेवेळी खासदार अडसूळ यांच्यासोबत चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, भावना गवळी, कृपाल तुमाने, राहुल शेवाळे, अरविंद सावंत एवढेच खासदार उपस्थित होते. या मागणीला कॉंग्रेसचे खासदार के. सुरेश, के. सी. वेणुगोपाल यांनी विरोध दर्शविला. परंतु, प्रवासाच्या मूलभूत हक्कांच्या मुद्द्यावर "एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी, "टीआरएस'चे नेते जितेंद्र रेड्डी, बिजू जनता दलाचे तथागत सत्पथी आदी शिवसेनेला पाठिंबा देताना दिसून आले.