'आधार'सक्तीबाबत आज फैसला ; सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ देणार निर्णय

'आधार'सक्तीबाबत आज फैसला ; सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ देणार निर्णय

नवी दिल्ली : आधार कार्डच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्या (ता. 26) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या वेळी "आधार'सक्तीबाबत निर्णय दिला जाणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह पाच सदस्यांचे घटनापीठ "आधार'बाबतचा निर्णय देणार आहे. 

आधार कार्डची सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला 27 याचिकांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठाने 38 दिवस याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या याचिकांमध्ये "आधार'च्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान देण्यात आले आहे. तसेच "आधार'सक्तीच्या निर्णयामुळे नागरिकांच्या खासगीपणाच्या अधिकारावर गदा येत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर "आधार'सक्तीबाबतच्या घटनापीठाच्या उद्याच्या (ता. 26) निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये म्हटले होते की, घटनेच्या कलम-21 नुसार देण्यात आलेला खासगीपणाचा अधिकार हा व्यक्तीचा अंगभूत अधिकार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढील सुनावणी 10 मे रोजी पूर्ण झाली होती. त्या वेळी सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. "आधार'सक्तीमुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते की नाही, याचा निर्णय उद्या (ता. 26) घटनापीठाकडून दिला जाणार आहे. 17 जानेवारी 2018 पासून या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com