आता सरपंचांशी प्रभू यांचा पत्राचार! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 जून 2017

गावपातळीवर थेट संपर्क करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देशातील तमाम ग्राममंचायती व सरपंचांना पत्रे पाठविण्याची अभिनव कल्पना अमलात आणली आहे. रेल्वेच्या 16 विभागांतील दोन लाख 55 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांना प्रभू यानी स्वतःच्या सहीने पत्रे पाठविली आहेत.

नवी दिल्ली - गावपातळीवर थेट संपर्क करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देशातील तमाम ग्राममंचायती व सरपंचांना पत्रे पाठविण्याची अभिनव कल्पना अमलात आणली आहे. रेल्वेच्या 16 विभागांतील दोन लाख 55 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांना प्रभू यानी स्वतःच्या सहीने पत्रे पाठविली आहेत. रेल्वेच्या विस्तारीकरणात आगामी काळात जमिनींची मोठ्या प्रमाणावर लागणारी गरज पाहून प्रभू यांनी ग्राममंचायती व सरपंचांना विश्‍वासात घेण्यासाठी ही कल्पना अमलात आणली असून राज्यनिहाय वेगवेगळ्या भाषांमध्ये ही पत्रे त्यांनी पाठविली आहेत, हे याचे आणखी एक वैशिष्ट्य. प्रभू यांच्या सहीचे एक पत्र "सकाळ'ला उपलब्ध झाले आहे. 

प्रभू यांनी मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून रेल्वेने देशभरात विविध योजनांचा धडाका उडवून दिला आहे. नव्या गाड्यांच्या टाळ्याखाऊ घोषणा करण्याची पद्धत प्रभू यांनी वेगळ्या अर्थसंकल्पाबरोबरच इतिहासजमा केली. रेल्वेचे अनेक प्रस्तावित प्रकल्प प्रचंड मोठ्या रकमांचे आहेत. साहजिकच यातील अनेक रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करायचे तर खासगी-सार्वजनिक भागीदारीशिवाय (पीपीपी) पर्याय नाही. या स्थितीत या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनींचा प्रश्‍न उग्र होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर प्रभू यांनी थेट ग्रामपंचायती व सरपंचांशी संवाद साधण्याचा पत्ररूपी अभिनव उपाय अमलात आणला आहे. ग्रामपंचायती व सरपंचांना स्वतःच्या सहीने त्यांनी पत्रे पाठविली आहेत.

मराठीतून लिहीलेल्या पत्रात "माझी नाळ महाराष्ट्राच्या मातीशी व इथल्या भूमीपुत्राशी जोडलेली आहे,' असे त्यांनी म्हटले आहे. "आज आपल्याशी थोडे हितगूज करण्याची इच्छा आहे,' असे सुरवातीलाच सांगून प्रभू यांनी पत्रात पुढे म्हटले आहे, 'पंतप्रधान नरेद्र मोदीच्या नेतृत्वाने देशाला नवी उर्जा मिळाली आहे. त्यांनी नवभारताची संकल्पना मांडली असून त्या दिशेने पावले पडत आहेत. यात आपली अमूल्य साथ हवी यासाठी हा पत्रप्रपंच आहे. मोदी यांनी नऊ नोव्हेंबर 2014 रोजी माझी रेल्वे मंत्रिपदी नियुक्ती केली. जगातील मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये समावेश असलेल्या भारतीय रेल्वेच्या कर्णधारपदाची धुरा माझ्याकडे आल्यावर त्यात मूलगामी सुधारणा करण्याचे उद्दिष्ट बाळगून माझी वाटचाल सुरू आहे. रेल्वे केवळ दळणवळणाचे साधन नसून देशाच्या सर्वांगीण विकासाची मुख्य वाहिनी म्हणून तिचा विकास व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. लहानलहान गावांना रेल्वेद्वारे मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने विविध योजना वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्राचा शाश्‍वत समतोल व सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे व रेल्वेच्या सशक्त माध्यमातून हे स्वप्न साकार करावे अशी माझी मनोमन इच्छा आहे. माझे प्रयत्न प्रामाणिक असून त्यांना तुमची साथ मिळेल असा विश्‍वास मला वाटतो,' असेही प्रभू यांनी म्हटले आहे.