सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे सरकारकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

लष्कराने सुपूर्त केल्या चित्रफिती

लष्कराने सुपूर्त केल्या चित्रफिती
नवी दिल्ली - पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकच्या (लक्ष्यभेदी हल्ला) चित्रफिती लष्कराने सरकारच्या सुपूर्त केल्याची माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज दिली. मात्र, ती सार्वजनिक करायची की नाही, याचा निर्णय सर्वस्वी सरकारचा असेल, असेही त्यांनी सांगितले. जनरल दीपक कपूर, जनरल जे. जे. सिंग, जनरल व्ही. पी. मलिक या माजी लष्कर प्रमुखांनी चित्रफिती सार्वजनिक करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची आज बैठक होऊन त्यामध्ये सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी गृह व अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी लष्करी कारवाईचे पुरावे देण्याची मागणी केल्यानंतर एकच गदारोळ झाला आहे आणि भाजपने त्याचा मोठा मुद्दा केला आहे. काँग्रेसने निरुपम यांच्या विधानापासून स्वतःला दूर ठेवून लष्करी कारवाईच्या सत्यतेबाबत पक्षाला शंका नसल्याचे म्हटले आहे.

या पार्श्‍वभूमीवरच अहिर यांनी केलेले आजचे निवेदन महत्त्वपूर्ण मानले जाते. अहिर यांच्या म्हणण्यानुसार, याबाबत काही नियम आणि निकष असतात. त्यांचे पालन करण्याचा भाग म्हणूनच लष्करातर्फे हे पुरावे सरकारच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पूर्वी लेखी स्वरूपात अहवाल दिले जात असत. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते चित्रफितीच्या स्वरूपात सादर होऊ लागले आहेत. 

लष्कराच्या चित्रफिती जाहीर करावयाच्या की नाहीत, याबाबत वाद सुरू झाले आहेत. अनेक माजी लष्करप्रमुखांनी तसेच सामरिक तज्ज्ञांनी या कल्पनेस विरोध दर्शविला आहे. यामुळे शत्रूला भारतीय सैन्याने अवलंबिलेल्या डावपेचांची माहिती मिळू शकते आणि ती एक गंभीर चूक ठरेल, असा इशाराच या माजी सेनाधिकाऱ्यांनी दिला आहे. जनरल मलिक यांनी तर या मागण्यांचे वर्णन ‘शुद्ध मूर्खपणा’ असल्याचे म्हटले.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची आज बैठक झाली. त्यामध्ये सीमावरील परिस्थितीचा प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. या बैठकीपूर्वी गृहमंत्री राजनाथसिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट व चर्चा झाली आणि त्यानंतर पंतप्रधानांकडे सुरक्षा समितीची बैठक झाली. त्यामध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरही सामील झाले. त्यामध्ये पाकिस्तानकडून काल झालेल्या तोफांचा मारा, त्यानंतर सीमा भागातील नागरिकांचे पलायन व त्यातून उत्पन्न परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. डोवाल यांनी त्यांची पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नसीर जनजुआ यांच्याबरोबर झालेली बोलणी तसेच चिनी राजदूतांबरोबरची चर्चा, यांचे तपशील दिल्याचे समजते. पाकिस्तानतर्फे संघर्षव्याप्ती न वाढविण्याबाबतची निवेदने केली जात असली तरी, पाकिस्तानने अद्याप काश्‍मीरचा मुद्दा सोडला नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याने भारताने पाकिस्तानच्या शांततेच्या आवाहनांवर फारसा प्रतिसाद न देण्याचे धोरण स्वीकारले आहे. 

सर्जिकल स्ट्राइकबाबत स्वतःच्याच देशातील सरकारकडे पुरावे मागणे किंवा त्याच्या सत्यासत्यततेबाबत शंका घेणे हे एक भारतीय म्हणून बेजबाबदारपणाचे तर आहेच; पण जी माहिती खुद्द लष्कराने जगजाहीर केली आहे त्यापेक्षा जास्त माहिती देणे देशाच्या हिताचे नाही.
- वेंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री