"यूपी'तील घटनेने लालूप्रसाद चिंताग्रस्त : सुशील मोदी

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

जर लालूप्रसाद यादव यांच्या प्रभावाबाहेर त्यांचे दोन्ही पुत्र राहिले, तरच राजकीय भविष्य उज्ज्वल आहे, अन्यथा ते बासरी वाजवत राहतील.

पाटणा - यूपीतील समाजवादी पक्षातील संघर्ष पाहून राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव भयभीत झाले असल्याचे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनी म्हटले आहे.

लालूप्रसाद यादव यांनी यूपीतील घटनेचा धसका घेतला असल्याचेही मोदी यांनी नमूद केले. ज्या पद्धतीने यूपीत मुलाने वडिलांविरुद्ध बंडखोरी केली आहे, ते पाहून लालूप्रसाद चिंताक्रांत झाले आहेत. आमचे चिरंजीव राजकारणात नाहीत म्हणून मला चिंता नाही, असेही सुशील मोदी म्हणाले.

लालूप्रसाद यादव यांच्या पुत्रांना सल्ला देताना सुशील मोदी यांनी म्हटले, की 15 वर्षांच्या राजकीय वारसांवर दावा ठोकू नये. कारण ते 15 वर्षे खूपच कलंकीत आहेत. या दरम्यान राज्यातील नागरिकांनी स्वत:ला बिहारी म्हणून घेणे आवडत नाही. जर लालूप्रसाद यादव यांच्या प्रभावाबाहेर त्यांचे दोन्ही पुत्र राहिले, तरच राजकीय भविष्य उज्ज्वल आहे, अन्यथा ते बासरी वाजवत राहतील. दरम्यान, नवीन वर्षानिमित्त लालूप्रसाद यांचा मोठा मुलगा आणि आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव हा गोशाळेत बासरी वाजतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.