स्वराज यांच्या ममत्वाने पाक मुली भारावल्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

सुषमा स्वराज यांचा मुलगी म्हणून घेणे मला अभिमानास्पद आहे. भारतीय लोक पाहुण्यांना देवासमान वागवितात. 
- अलिया हरिर, पाकिस्तानच्या मुलींची गटप्रमुख 

नवी दिल्ली - उरी हल्ल्यानंतर व भारताने पाकव्याप काश्‍मीरमध्ये केलेल्या "सर्जिकल‘ हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत बोलतानाही पाकिस्तानवर कडाडून हल्ला केला. पण भारतात आलेल्या पाकिस्तानी मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या देशात पोचविताना "मुली या सर्वांच्याच आहेत. त्याला कोणतीही सीमाभेद नाही‘, असे सांगितले. त्यांनी या मुलींची आईच्या ममतेने काळजी घेतल्याने सीमेपलीकडील नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला आहे. 

पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये हल्ला करण्यापूर्वी युवा महोत्सवात भाग घेण्यासाठी पाकिस्तानहून मुलींचा एक गट नवी दिल्लीत आला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये "सर्जिकल‘ हल्ला केला. यानंतर दोन्ही देशांदरम्यानचे संबंध ताणले गेले आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने या मुलींच्या कुटुंब त्यांच्या सुरक्षेविषयी चिंतीत झाले होते. त्यांनी परत घरी परतावे, असे त्यांना वाटत होते. महोत्सवाचे आयोजकांनाही त्यांची चिंता वाटत होती. परराष्ट्र मंत्रालयाने या मुलींची सर्वप्रकारे काळजी घेत त्या दिल्लीत असेपर्यंत व नंतर पाकिस्तानला पोचेपर्यंत त्यांना सुरक्षा पुरविली. महोत्सवाची सांगता झाल्यानंतर या मुली पाकिस्तानला सुरक्षितपणे पोचल्या. 

भारतात प्रथमच आलेल्या या मुलींना मिळालेल्या आपुलकीच्या वागणुकीमुळे व सुषमा स्वराज यांनी पुरविलेल्या सुरक्षेमुळे पाकिस्तानी मुलींचे हे पथक व त्यांचे कुटुंब भारावून गेले आहे. या पथकाची प्रमुख अलिया हॅरिर हिने त्याबद्दल ट्‌विट करुन त्यांचे आभार मानले. त्यावर सुषमा स्वराज यांनी "मुली या आपल्या सर्वांच्या आहेत. त्यात सीमेचा कोणताही अडथळा येत नाही. त्यामुळे तुमच्याविषयी मला चिंता वाटत होती,‘ असे उत्तर ट्‌विटरवरून सोमवारी दिले. 

Web Title: Sushma Swaraj wins Internet again with tweet to Pakistani girl